बसमधून उतरताना 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; कुटुंबाला 67.40 लाखांची भरपाई; काय घडलं नेमकं?
बस थांबवताना चालकाने आवश्यक खबरदारी घेणे आणि प्रवाशांना सुरक्षितपणे उतरण्याची संधी देणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते.
दिल्लीमध्ये बसमधून उतरताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या 41 वर्षीय नैन सिंह बिष्ट यांच्या कुटुंबाला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) 67.40 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. बसचालकाने बस पूर्णपणे थांबवण्याऐवजी पुन्हा वेग वाढवल्यामुळे हा अपघात झाल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले. मृत व्यक्तीचीही या दुर्घटनेत काही चूक होती, असा विमा कंपनीचा युक्तिवाद न्यायाधिकरणाने मान्य केला नाही.
नेमका अपघात कसा घडला?
ही घटना 14 मे 2025 रोजी पहाटे सुमारे दोन वाजता दिल्लीतील दक्षिण भागात महिपालपूरजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 वर घडली. नैन सिंह बिष्ट बसमधून उतरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी बसचालकाने बसचा वेग कमी केला; मात्र बस पूर्णपणे थांबण्यापूर्वीच पुन्हा वेग वाढवला.
यामुळे बिष्ट यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वसंत कुंज दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसचालकाच्या निष्काळजीपणावर न्यायाधिकरणाचा ठपका
या प्रकरणाची सुनावणी करणारे पीठासीन अधिकारी शिरीष अग्रवाल यांनी 23 सप्टेंबर 2026 रोजी निर्णय दिला. अपघात हा बसचालकाच्या बेदरकार आणि निष्काळजी वाहनचालवण्यामुळे झाल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, बस थांबण्याच्या अगदी जवळ होती; मात्र ती पूर्णपणे थांबली नव्हती. त्यानंतर चालकाने वेग वाढवल्याने बिष्ट खाली पडले. बस पूर्णपणे थांबली असती आणि त्यानंतर वेग वाढवला नसता, तर हा अपघात टाळता आला असता, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले.
‘मृत व्यक्तीचीही चूक होती’, विमा कंपनीचा दावा फेटाळला
विमा कंपनीने असा युक्तिवाद केला की, नैन सिंह बिष्ट हे अधिकृत बसथांबा नसलेल्या ठिकाणी बसमधून उतरत होते. तसेच, बस पूर्णपणे थांबण्यापूर्वी उतरण्याचा प्रयत्न केल्यामुळे अपघातासाठी त्यांचीही काही प्रमाणात जबाबदारी होती.मात्र, न्यायाधिकरणाने हा युक्तिवाद फेटाळला. प्रवाशाच्या विनंतीवरून बसचालक एखाद्या अनधिकृत ठिकाणी बस थांबवण्यास तयार झाला असेल, तर त्या ठिकाणी उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशालाच अपघातासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. बसचालकाचे वाहन चालवण्यातील वर्तन हा अपघाताचा प्रमुख कारणीभूत घटक असल्याचेही नमूद करण्यात आले.
पत्नी आणि चार मुलांना मिळणार भरपाई; नेमकी रक्कम किती?
नैन सिंह बिष्ट यांच्या पश्चात पत्नी हरू देवी बिष्ट, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून न्यायाधिकरणाने भरपाई निश्चित केली. भरपाईचा तपशील पुढीलप्रमाणे
आर्थिक अवलंबित्वामुळे झालेले नुकसान: ₹60,07,365
कौटुंबिक सहजीवनाच्या नुकसानीची भरपाई: ₹2,42,000
मालमत्तेच्या नुकसानीसाठी: ₹18,150
अंत्यसंस्काराचा खर्च: ₹18,150
एकूण भरपाई: ₹62,85,665
निर्णयापर्यंतचे व्याज: ₹4,54,401
व्याजासह एकूण रक्कम: ₹67,40,066, म्हणजेच सुमारे ₹67.40 लाख. या रकमेतून 60 टक्के हिस्सा पत्नीला, तर उर्वरित रकमेतील प्रत्येकी 10 टक्के हिस्सा चारही मुलांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विमा कंपनीला 30 दिवसांत रक्कम जमा करण्याचे निर्देश
या प्रकरणात बसचालक, बसमालक आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांना भरपाईसाठी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे जबाबदार धरण्यात आले. न्यायाधिकरणाने विमा कंपनीला भरपाईची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले. भरपाईच्या रकमेवर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून निर्णयापर्यंत वार्षिक 7.5 टक्के व्याज लागू करण्यात आले आहे. निर्णयानंतर निर्धारित मुदतीत रक्कम जमा न झाल्यास वार्षिक 9 टक्के दराने व्याज देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.