'तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, तुमच्यात प्रामाणिकपणा नाही,' वकिलाची थेट सरन्यायाधीशांसमोर टिप्पणी, पुढे घडलं असं काही...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर वकिलाने आक्षेपार्ह टिप्पणी केली. "तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुमच्यात प्रामाणिकपणा नाही," असं वकिलाने सरन्यायाधीशांना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर एका वकिलाने आक्षेपार्ह टिप्पणी केली. "तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुमच्यात प्रामाणिकपणा नाही," असं वकिलाने सरन्यायाधीशांना म्हटलं. यावेळी सरन्यायाधीशांनी वकिलाला थांबण्यास सांगत, "आम्ही पाहू," असे म्हटले. मात्र, वकिलाने थांबण्यास नकार दिला. वकिलाने आपले प्रकरण तातडीचे असल्याचे सांगत सुरुवातीला माफीही मागितली. 2 नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या कार्यालयात सादर केले होते. मात्र, 15 दिवस उलटूनही उत्तर न मिळाल्याने न्यायालयात यावे लागल्याचे त्याने सांगितले.
यावर न्यायमूर्ती मोहना यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, वकिलाच्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण म्यूट करण्यात आले. यानंतर सदर वकिलाला कोर्टरूममधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी वकिलांनी दिली. या घटनेनंतर कोर्टात उपस्थित अन्य वकिलांनी संबंधित वकिलाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सरन्यायाधीशांकडे केली. संबंधित वकील स्वतःविरोधात सुरू असलेल्या अवमानना प्रकरणामुळे संतप्त असल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
दुपारी 2 वाजता, विहित प्रक्रियेचे पालन न करता हा विषय उपस्थित केल्याबद्दल सुरुवातीलाच माफी मागत, वकिलाने सरन्यायाधीश, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाला कागदपत्रे पाहण्याची विनंती केली. ही गोष्ट २ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना त्यांच्या कार्यालयात देण्यात आली होती. 15 दिवस उलटूनही त्यांनी मला कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे मला या न्यायालयासमोर येणे भाग पडले आहे," असे त्यांनी सांगितलं. यावर न्यायमूर्ती मोहना यांनी टिप्पणी केली, "तुम्ही अशा प्रकारची कोणतीही गोष्ट येथे मांडू शकत नाही."
'तुम्ही त्या खुर्चीवर बसू शकत नाही'
वकिलांनी आपला आग्रह कायम ठेवत म्हटले, "नाही, ही आणीबाणीची परिस्थिती असल्याने मी आलो आहे. सर्वप्रथम मी माफी मागतो. कृपया एकदा ही कागदपत्रे पाहून घ्या." सरन्यायाधीशांनी (CJI) त्यांना थांबण्यास सांगितलं आणि म्हणाले, "आम्ही पाहू, तुम्ही थोडा वेळ थांबा." मात्र, वकिलाने थांबण्यास नकार दिला आणि सरन्यायाधीशांवर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली. "नाही, मी थांबणार नाही. तुम्ही त्या खुर्चीवर बसू शकत नाही, तुम्ही त्यासाठी पात्र नाही. तुमच्याकडे त्यासाठी आवश्यक असलेला प्रामाणिकपणा नाही!" असं ते ओरडून म्हणाले.
वकिलांने आक्षेपार्ह कृत्य केल्यानंतर कामकाजाचे ऑडिओ-व्हिडिओ प्रसारण बंद करण्यात आले. मात्र, न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्या वकिलाला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढण्यात आले.