एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या करत संपूर्ण कुटुंब ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सात वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. इंदुशेखर असं आरोपीचं नाव असून तो कॅबचालक आहे. आपली पत्नी तिच्या माहेरच्या लोकांशी सतत संपर्कात राहते, या रागातून त्याने पत्नीसह तिच्या कुटुंबातील सहा सदस्यांचा जीव घेतल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सात वर्षांच्या पुनीत नावाच्या मुलाचा मृतदेह हस्तगत केला असून, इतर मृतदेहांचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये इंदुशेखरची पत्नी सुनिता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, मेहुणी दिव्या आणि नलिनी, तसेच शंकरचा सात वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासावरून आरोपीने कट रचून हत्या केल्याचं दिसत आहे. त्याने सर्वात आदी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर, पार्टी देण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या दोन मेहुण्यांना घरी बोलावून त्यांचीही हत्या केली. त्यानंतर त्याने त्यांच्या पत्नींची, आपल्या सासूची आणि शंकरच्या लहान मुलाचीही हत्या केली.
पोलिसांचा संशय आहे की, आरोपीने पीडितांच्या डोक्यावर पाटा मारून त्यांची हत्या केली असावी. त्याने मृतदेह स्वतःच्या कारमधून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. तसेच, रक्ताचे डाग पुसून टाकण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने रसायनांचा वापर केला असावा, असाही संशय तपासकर्त्यांना आहे.
प्राथमिक तपासावरून असे सूचित होते की, या हत्या कौटुंबिक वादातून झाल्या आहेत. इंदुशेखर आपली पत्नी वारंवार तिच्या माहेरच्या लोकांशी बोलत असल्याचे त्याला आवडत नव्हते. पोलिसांच्या मते, याच कारणामुळे त्याने या हत्या केल्या असाव्यात.
श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. चौकशीदरम्यान आरोपीने परस्परविरोधी विधाने केली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि सामूहिक हत्येचा प्रकार समोर आला.
नंदी हिल्सच्या पायथ्याशी चार तास चाललेल्या शोधमोहिमेत, पोलिसांनी शंकर यांच्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणातील सापडलेला हा पहिला मृतदेह आहे. पोलीस सूत्रांनुसार, इंदुशेखरने कुटुंबातील सर्व सातही सदस्यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, तपास अधिकारी अजूनही त्याच्या दाव्यांची पडताळणी करत असून उर्वरित मृतदेहांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या जात आहेत.