अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, जंतरमंतर नाही तर दिल्लीच्या मध्यवर्ती भागातच होणार कार्यक्रम!
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर झालेल्या कारवाईवर दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ तिरंगा फडकवल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाले आहेत. ‘लहरा दो तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 16 ऑक्टोबरला दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीपकेंच्या या घोषणेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
16 ऑक्टोबरला दिल्लीच्या सेंट्रल पार्कमध्ये कार्यक्रम
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी 16 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून सांगितले. राष्ट्रीय ध्वजाचा अभिमान बाळगणाऱ्या नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दीपके यांनी केले आहे.
दोन CJP नेत्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी जंतरमंतर परिसरात कथितरीत्या बॅरिकेड्स ओलांडून परवानगीशिवाय प्रवेश केला होता. या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
‘तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही’; दीपकेंची भूमिका
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर झालेल्या कारवाईवर दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ तिरंगा फडकवल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरचा कार्यक्रम हा या कारवाईविरोधातील निषेधाचे प्रतीक ठरणार आहे.‘आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि तो फडकवणे हा गुन्हा नाही,’ अशी भूमिका दीपके यांनी मांडली.
अटकेची शक्यता असली तरी मागे हटणार नाही, असा दावा
या कार्यक्रमानंतर आपल्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याचे दीपके यांनी म्हटले आहे. मात्र, त्याची चिंता नसल्याचे सांगत त्यांनी तिरंगा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. दिल्लीला येणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपल्या शहरांत तिरंगा मोर्चे काढून मोहिमेला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.या घोषणेमुळे 16 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे आणि पोलिस प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात काय घडलं?
CJP आणि इतर काही संघटनांकडून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीवरून यापूर्वीही आंदोलन झाले होते. आता दोन नेत्यांच्या कोठडीच्या पार्श्वभूमीवर ‘लहरा दो तिरंगा’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरला सेंट्रल पार्कमध्ये किती लोक सहभागी होतात, पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि आंदोलनाचा पुढील टप्पा काय असतो, याकडे लक्ष असेल.