'पुढल्या 20 वर्षात तुमचा मृत्यू होईल', आनंद महिंद्रांसाठी पोस्ट; स्वत: या पोस्टवर रिप्लाय करत म्हणाले, 'माझी एक्सपायरी डेट...'
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरील चर्चा आणि संवादासाठी ओळखले जातात. ते यासाठी नेटकऱ्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. मात्र नुकताच त्यांनी अशा एका पोस्टवर रिप्लाय दिलाय ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केलंय.
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अनेकदा त्यांच्या पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा आनंद महिंद्रा आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना दिसतात. कधी एखादी विचित्र मागणी मान्य करणं तर कधी एखाद्या विचित्र गोष्टीवर प्रतिसाद देण्याचं काम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आनंद महिंद्रा करत असतात. मात्र हल्लीच त्यांनी एका अशा प्रतिक्रियेवर प्रतिसाद दिला आहे ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.
आनंद महिंद्रांच्या आयुष्याचे 20 वर्ष शिल्लक असा उल्लेख
'एक्स'वरील म्हणजेच ट्विटरवरील एका युझरने आनंद महिंद्रांना एक शक्तिशाली व्ही 8 किंवा व्ही 10 इंजिन असलेल्या कार्स तुमच्या कंपनीने तयार कराव्यात अशी विनंती केली. पण ही विनंती करताना त्याने आनंद महिंद्रा यांना अजून 20 वर्षांचा आयुष्य शिल्लक असून त्याच्या आत त्यांनी हे करावं असं म्हटलं. यावरुनच आनंद महिद्रांनी रिप्लाय केलाय. आनंद महिंद्रांनी या पोस्टला अगदी मिश्किल शब्दांमध्ये उत्तर दिलं असून अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय सुचवलं?
एका चाहत्याने आनंद महिंद्रांकडे 500 हॉर्सपॉवरच्या 'स्कॉर्पिओ'ची मागणी करणारी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट 15 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेली. प्राणेश नायडू नावाच्या व्यक्तीने देशातील नावाजलेल्या उद्योजकांपैकी एक असलेल्या आनंद महिंद्रा यांचा "आनंद काका" (Anand uncle) असा उल्लेख केला. मी लहानपणापासून तुमचा चाहता आहे, असं म्हणत प्राणेशने त्यांच्याबद्दल वाटणारा आदर दाखवला पण पुढे एक विनंती करताना त्याने, आनंद महिंद्रांनी त्यांच्या कंपनीत 500 हॉर्सपॉवरची क्षमता असलेले 'स्मॉल-ब्लॉक V8' इंजिन असलेली 'स्कॉर्पिओ' बनवावी असं सुचवलं. खूप उशीर होण्यापूर्वी कंपनीने एक शक्तिशाली व्ही 8 किंवा व्ही 10 इंजिन तयार करण्याचा विचार करावा, असंही त्याने सुचवलं. पण हे सुचवताना त्याने आनंद महिद्रांच्या मृत्यूचा उल्लेख केला.
अनेकांना खटला उल्लेख
प्राणेशने, "पुढील 20 वर्षांत कदाचित तुम्ही हयात नसाल," असं आनंद महिंद्रांना पोस्टमध्ये म्हटलं. त्यामुळेच आधुनिक इंजिन तयार केलं तर आनंद महिंद्रा आपल्या मागे काहीतरी असाधारण सोडून जातील, असं प्राणेशने म्हटलं. स्कॉर्पिओचा आणि आनंद महिंद्रांचा चाहता म्हणून प्राणेशचं म्हणणं अनेकांना योग्य वाटलं तरी त्याने आनंद महिंद्रांच्या मृत्यूसंदर्भात केलेला उल्लेख अनेकांना खटकला आणि त्यांनी तो बोलूनही दाखवला.
आनंद महिंद्रांनी नाराज होण्याऐवजी...
आपल्या मृत्यूचं भाकित करणाऱ्या या पोस्टवर नाराज होण्याऐवजी, आनंद महिंद्रांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत या तरुणाला उत्तर दिले. त्यांनी प्राणेशने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याचे आधी आभार मानले. मात्र त्याचवेळी एक उपरोधिक टोलाही आपल्या रिप्लायमधून लगावला. माझ्या उर्वरित आयुष्याबद्दल तू इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतो अशा अर्थाचा प्रश्न आनंद महिंद्रांनी केला.
अधिक जगायला आवडेल
आनंद महिंद्रांनी, "मला इथून पुढं 20 वर्षांपेक्षा जास्त काळ जगायला आवडेल. जरी 20 वर्षे हा देखील एक मोठा आणि सन्माननीय काळ मानला तरी अजून दिर्घकाळ पृथ्वीवर राहण्याचा माझा विचार आहे," असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
एक्सपायरी वाढवण्याची मागणी
आनंद महिद्रांच्या या रिप्लायने त्यांच्या मृत्यूसंदर्भातील उल्लेखामुळे या पोस्टखाली तापलेलं सर्व वातावरण अगदी शांत झालं. आनंद महिंद्रांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील संदर्भाचा वापर करून चाहत्याच्या भाकितावर मिश्किल टिप्पणी केली. शक्तिशाली व्ही 8 इंजिनच्या कल्पनेवर विचार करण्यापूर्वी, त्यांनी स्वतः या चाहत्याकडे, "माझी एक्सपायरी डेट वाढवून देशील का?" अशी मजेशीर विनंती प्राणेशला क केली.
आनंद महिंद्रांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसतेय.