मध्य प्रदेशातील गुना येथे सरकारी गर्ल्स स्कूलमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवला. यानंतर एकट्याने भेटण्याचा दबाव आणल्याचा गंभीर आरोप आहे. विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी दिली. विद्यार्थीनीने तक्रारीत याची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
गुना शहरातील कॅन्ट परिसरातील पीएमश्री गर्ल्स उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. नरेंद्र कुशवाह असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बारावीच्या एका विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. शिक्षकाने काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठवत असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केलाय.
शिक्षक तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी आणि एकट्याने भेटण्यासाठी सांगत होता. त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचेही विद्यार्थीनीने तक्रारीत नमूद केलंय.
विद्यार्थिनीने शिक्षकाच्या वागण्याला विरोध केल्यानंतर परीक्षेत कमी गुण देण्याची आणि अभ्यासाचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. शाळेतील सर्व गोष्टी आपल्या हातात असल्याचे सांगून शिक्षक दबाव आणत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीला आपल्या शैक्षणिक भवितव्याची चिंता वाटू लागल्याचे वृत्त आहे.
सततच्या संदेशांमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने अखेर आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने शाळेचे प्राचार्य, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तक्रारीसोबत व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉटही सादर करण्यात आले. प्राचार्य संजय कुमार जैन यांनी तक्रार मिळाल्यानंतर ती चौकशीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवल्याचे सांगितले.
शिक्षकाने शाळेच्या आवारात पडदा लावून स्वतंत्र जागा तयार केली होती आणि तिथे बसून बोलण्यासाठी विद्यार्थिनीवर दबाव आणत होता, असा आणखी एक आरोप तक्रारीत आहे. इतर विद्यार्थिनींसोबतही असे प्रकार होत असल्याची शंका तिने व्यक्त केलीय.
विद्यार्थिनीची तक्रार आणि उपलब्ध व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे गुना पोलिसांनी नरेंद्र कुशवाह याच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडूनही पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.