Vaibhav Sooryavanshi : रायजिंग स्टार आशिया कप 2026 मध्ये इंडिया ए आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी केली. वैभवने केवळ 52 बॉलमध्ये 204 धावांची खेळी करून लिस्ट ए मधील सर्वात वेगवान द्विशतक ठोकलं. त्याने लिस्ट ए मधील सर्वात वेगवान शतक सुद्धा ठोकलं जे त्याने 28 बॉलमध्ये पूर्ण केलेलं. याशिवाय वैभवने सर्वात जलद 150 धावा ठोकण्याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावे केला. सामन्याच्यानंतर वैभवने सांगितलं की त्याने हे द्विशतक असंच ठोकलं नाही तर त्यापूर्वी त्याने या मोठ्या खेळीचं प्लॅनिंग केलं होतं.
सुरुवातीच्या दोन सामन्यात राहिला फ्लॉप :
वैभव सूर्यवंशी हा सुरुवातीच्या दोन सामन्यात फ्लॉप राहिला होता. नेपाळ विरुद्ध पहिल्या ग्रुप स्टेज सामन्यात सुद्धा त्याने 26 धावांची खेळी केलेली तर पाकिस्तान विरुद्ध तो 11 धावा करून बाद झालेला. वैभव म्हणाला की सुरुवातीच्या दोन सामन्यात तो लवकर बाद झाला होता, ज्यामुळे पुढील सामन्यासाठी त्याने चांगला प्लॅन केला.
204 धावांसाठी वैभव सूर्यवंशीने केलेली प्लॅनिंग?
204 धावा ठोकल्यावर वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'गेल्या दोन सामन्यांत मी सेट झालो होतो, पण मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही. त्यामुळे मैदानात उतरल्यावर सुरुवातीला थोडा वेळ घेईन असं प्लॅनिंग केलं होतं. मात्र एक दोन बॉल खेळल्यानंतर माझ्या लक्षात आले की गोलंदाजांना पिचकडून फारशी मदत मिळत नाहीये, म्हणून मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवून खेळण्याचा निर्णय घेतला'.
फलंदाजी करताना डोक्यात काय सुरु असतं?
वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'माझ्या मनात काहीही विशेष योजना नव्हती. फक्त एवढाच विचार होता की, जर खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असेल, तर मी संयम राखून दीर्घ खेळी करेन. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. खेळपट्टी चांगली होती आणि बॉल बॅटवर व्यवस्थित येत होता, त्यामुळे मी माझ्या नैसर्गिक शैलीतच फलंदाजी केली'.