गर्लफ्रेंड, रेस्तराँ आणि खास आठवण... राहुल गांधींच्या खासगी आयुष्यातील किस्सा चर्चेत; गर्लफ्रेंड कोण याची चर्चा?
राहुल गांधी यांनी खासगी आयुष्यातील किस्सा शेअर केला आहे. आई वडिलांची जिथे भेट झाली तिथेच मी माझ्या गर्लफ्रेंडला गेऊन गेलो असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींची गर्लफ्रेंड कोण अशी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आयुष्यातील खाजगी किस्सा चर्चेत आला आहे. कॉंग्रेसच्या संसदीय पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राचा प्रकाश सोहळा दिल्लीत पार पडला. यावेळी राहुल गांधी यांनी एक खास गोष्ट सांगितली. मी माझ्या गर्लफ्रेंडला तिथेच घेऊन गेलो जिथे आई वडिलांची भेट झाली असं राहुल गांधी यांनी सांगितले. मात्र, यावेळी राहुल गांदी यांनी गर्लफ्रेंडचे नाव सांगितले नाही. यामुळे राहुल गांधींची गर्लफ्रेंड कोण याची देखील चर्चा रंगली आहे.
'Belonging: A Journey of Love' या सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राहुल गांधींचा खासगी आयुष्यातील किस्सा शेअर केला. आई-वडिलांची भेट ज्या केंब्रिजमधील 'व्हर्सिटी' रेस्टॉरंटमध्ये झाली, तिथेच गर्लफ्रेंडला घेऊन गेल्याचे राहुल गांधींनी सांगितले. गर्लफ्रेंडला घेऊन रेस्टॉरंटला जाण्यामागे आई-वडिलांची भेट जिथे झाली ते ठिकाण पाहण्याची इच्छा होती.
'प्रेमात पडायचं असेल तर व्हर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जा; मात्र तिथे चिकन चासर कधीही खाऊ नका,' असा मिश्किल सल्ला राहुल गांधी यांनी दिला. सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात हा खास किस्सा सांगितला.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्राचे प्रकाशन
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्राचे आज अधिकृत प्रकाशन झाले. या पुस्तकातून स्वतःबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल पसरवण्यात आलेल्या चुकीच्या कथनांना सत्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. पती राजीव गांधी, सासू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंका यांच्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे खरे आयुष्य लोकांसमोर मांडण्यासाठी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हार्पर कॉलिन्सच्या पौलोमी चॅटर्जी यांच्याशी संवाद साधताना सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला मनातील भावना आणि वैयक्तिक अनुभव सार्वजनिक करण्याबाबत आपण साशंक होतो. मात्र, कुटुंबाबद्दल वास्तवाशी संबंध नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या जात असल्याने पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही मित्रांच्या मदतीने आत्मचरित्र लेखनाला सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला लेखन कठीण वाटले. मात्र, बालपणीच्या आठवणी आणि राजीव गांधी यांच्याशी झालेली पहिली भेट याबाबत लिहिणे सहज शक्य झाले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांशी संबंधित आठवणी लिहिणे सर्वाधिक वेदनादायी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
बिलाँगिंग’ या नावामागचा अनुभव
आत्मचरित्राला ‘बिलाँगिंग’ हे नाव देण्यामागील अनुभव सांगताना सोनिया गांधी म्हणाल्या की, लग्नानंतर सासरी येणाऱ्या अनेक भारतीय महिलांना नव्या घरात आणि तेथील वातावरणात स्वतःला सामावून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी सारखी असली तरी हा बदल सोपा नसतो. आपल्या बाबतीत हा बदल अधिक आव्हानात्मक होता. कारण आपण पूर्णपणे वेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातून भारतात आले होते, असे त्यांनी सांगितले.
भारतात आपलेपणाची भावना पहिल्यांदा कधी निर्माण झाली, या प्रश्नावर त्यांनी राजीव गांधी यांच्या मतदारसंघातील सुरुवातीच्या भेटींची आठवण सांगितली. तेथील लोक मनमोकळे आणि साधे होते. आपला परदेशी जन्म किंवा वेगळे बोलणे यापेक्षा आपण त्यांना भेटतो का, त्यांच्याशी संवाद साधतो का आणि त्यांच्या समस्या समजून घेतो का, याला ते महत्त्व देत होते. ‘मी त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तिथे जात होते. त्यामुळे मला तिथे घरच्यासारखे वाटू लागले,’ असे त्या म्हणाल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेला विजय हा आपल्याला देशाने स्वीकारल्याची जाणीव करून देणारा आणखी एक महत्त्वाचा क्षण होता, असेही त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधींकडून शिस्त, धैर्य आणि निर्धाराचे संस्कार
आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या संस्कारांबद्दल बोलताना सोनिया गांधी यांनी शिस्त, वक्तशीरपणा, धैर्य आणि निर्धार या गुणांचा उल्लेख केला. हे गुण आपल्याला सासू इंदिरा गांधी यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. इंदिरा गांधी आपल्या वैचारिक मार्गावर ठाम राहणाऱ्या होत्या. राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करू नये, अशी आपली सुरुवातीला इच्छा होती. कारण इंदिरा गांधी यांनी संपूर्ण आयुष्य सार्वजनिक कामासाठी समर्पित केले होते. त्याच आयुष्यामुळे आपल्याला पतीपासून दूर व्हावे लागेल, अशी भीती वाटत होती, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
मात्र, राजीव गांधी राजकारणात आल्यानंतर परिस्थिती बदलली आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले.
राजीव यांच्या हत्येनंतर मुलांनीच मला सावरले
राजीव गांधी यांच्या हत्येच्या धक्कादायक घटनेची आठवण सांगताना सोनिया गांधी भावूक झाल्या. त्या कठीण काळात राहुल आणि प्रियंका यांनीच आपल्याला मानसिक आधार दिला, असे त्यांनी सांगितले.
‘माझा मुलगा आणि मुलगी दोघेही माझ्या मदतीला धावून आले. मी त्यांचे मूल झाले आणि ते माझे आई-वडील झाले,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजीव गांधी पंतप्रधान असताना कुटुंबावर असलेल्या सुरक्षेच्या निर्बंधांमुळे राहुल आणि प्रियंका यांचे बालपणही कठीण गेले. जवळपास पाच वर्षे त्यांना घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांचे शिक्षणही घरीच झाले. इतर मुलांसोबत खेळणे आणि मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे त्यांना शक्य नव्हते.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांना हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी जायचे होते. मात्र, तेथील सुरक्षा व्यवस्थेच्या अडचणींमुळे त्यांना दुसऱ्या महाविद्यालयात वेगळ्या नावाने प्रवेश घ्यावा लागला. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि मैत्री करणे त्यांच्यासाठी कठीण झाले. प्रियंका मात्र आईची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहिली, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाने भारावल्या
आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, लोकांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी पाहून आपण भारावून गेलो आहोत. एवढा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. पुस्तकाबाबत समर्थकांसह टीकाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या. काही प्रतिक्रिया मनाला स्पर्श करणाऱ्या होत्या, तर काही प्रतिक्रिया नकारात्मक आणि कटू होत्या. मात्र, टीकाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण कधीही नियमितपणे डायरी लिहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय कारकिर्दीतही आपल्या अनुभवांची नोंद नियमितपणे ठेवली नव्हती, असे त्या म्हणाल्या.
तरुणांनी राजकारणात यावे - सोनिया गांधी
तरुणांना काय संदेश द्याल, या प्रश्नावर सोनिया गांधी यांनी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.वेगवेगळ्या गटांतील तरुण एकत्र येऊन आपला आवाज ऐकला जावा, अशी मागणी करत असल्याचे पाहून आनंद वाटतो. तरुणांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग ही देशाच्या भविष्यासाठी आशादायक बाब आहे, असे त्यांनी सांगितले.‘तरुणांना केवळ सल्ला देण्याऐवजी ज्येष्ठांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांना सल्ला देण्यापेक्षा आपण त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. तेच आपल्या देशाचे भविष्य आहेत,’ असे सोनिया गांधी म्हणाल्या.
राजीव गांधींच्या आठवणी सांगताना राहुल गांधी भावूक
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनीही राजीव गांधी यांच्यासोबतचे आईचे आयुष्य आणि त्यांच्या हत्येनंतर बदललेले कौटुंबिक आयुष्य याबद्दल भावना व्यक्त केल्या. राजीव गांधी यांच्या हत्येच्या घटनेने कुटुंबाचे आयुष्य एका दिवसात बदलून गेले. प्रेमाने भरलेले सुंदर आयुष्य अचानक संपले. तो काळ आईसाठी अत्यंत भयावह होता, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ‘माझ्या आईचे संपूर्ण आयुष्य माझ्या वडिलांशी जोडलेले होते आणि माझे वडीलही तिच्याशी जोडलेले होते. मात्र, वडील अचानक निघून गेले. त्यानंतर आईचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. आधीची आनंदी, हसतमुख आई बदलली. तिच्या आयुष्यातील ज्योतच जणू विझली होती,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भावना व्यक्त केल्या.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर भारतातील जनतेने सोनिया गांधी यांना स्वीकारले. ‘तुम्ही आमच्या आहात,’ असे सांगत देशातील लोकांनी त्यांच्यासाठी आपुलकीचे नवे दार खुले केले, असे राहुल गांधी म्हणाले.
या प्रकाशन सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अनेक विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह देखील उपस्थित होते.