दिल्लीत वेगवान हालचाली! केंद्र सरकारने बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; मोठ्या निर्णयाची शक्यता
परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत चर्चा सुरु असताना केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत चर्चा सुरु असताना केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. तसंच 3 डिसेंबरपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज संपण्याची शक्यता आहे. आवश्यक सरकारी कामकाजासाठी अधिवेशन पुन्हा बोलावलं असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
किरेन रिजिजू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सरकारने लोकसभेचे माननीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे माननीय सभापती यांना विनंती केली आहे की, आवश्यक शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी लोकसभेचे अधिवेशन सोमवार, 30 नोव्हेंबर 2026 रोजी आणि राज्यसभेचे अधिवेशन बुधवार 2 डिसेंबर 2026 रोजी पुन्हा सुरू करण्यात यावे. दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबर, 2026 रोजी संपू शकते".
ऑगस्ट 2026 मध्ये पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर, आता हे अधिवेशन बोलावलं जात आहे. या अधिवेशनात 'महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक' आणि 'परिसीमन विधेयक' मांडलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही विधेयकं केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहेत. 2023 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करता यावे, यासाठी ही दोन्ही विधेयके लवकरात लवकर कायद्यात रूपांतरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
याबाबत राजकीय आणि संसदीय अशा दोन्ही स्तरांवर हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवणे, हे सरकारसमोरील मुख्य आव्हान आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने 'नारी शक्ती वंदन अधिनियम' संमत केला, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्यांतर्गत मिळणारे आरक्षण त्वरित लागू होत नाही.
राज्यघटनेच्या कलम 334-A नुसार, संबंधित जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतरच मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणूनच, 2023 मध्ये कायदा संमत होऊनही, महिला आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत प्रश्न कायम आहेत.
या प्रक्रियेत जनगणना अत्यंत महत्त्वाची
या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे जनगणना. पुढील राष्ट्रीय जनगणना 2027 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर, त्यातील आकडेवारी अंतिम करणे आणि त्यावर आधारित पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करणे, यासाठीही वेळ लागेल. यामध्ये 'परिसीमन आयोगा'ची (Delimitation Commission) स्थापना करणे, मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित करणे आणि जागांचे आरक्षण ठरवणे, अशा अनेक टप्प्यांची पूर्तता करणे आवश्यक असते.
हे पाहता, जर महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक आणि पुनर्रचना विधेयक लवकर मंजूर झाले नाहीत, तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होऊ शकते. हा कालावधी लक्षात घेऊन, सरकारने 2026 मध्ये संसदेत तीन कायदेविषयक प्रस्ताव मांडले होते, ज्यामध्ये 'संविधान (131 वी घटनादुरुस्ती) विधेयक' आणि पुनर्रचना विधेयकाचा समावेश होता. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करणे आणि लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 816 पर्यंत वाढवणे, हा सरकारचा मानस होता.
प्रस्तावित आराखड्यात महिलांसाठी 273 जागा राखीव ठेवण्याची योजनाही होती. मात्र, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत हे घटनादुरुस्ती विधेयक आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवू शकले नाही. परिणामी, पुनर्रचना विधेयक किंवा केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विधेयकांवर कोणतीही पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.