मध्य रेल्वेकडून ₹25 हजार मिळणार, कारण...; मुंबईतील KC कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं घडलं काय? तिकीट WL 1 वर असताना अचानक...
ट्रेनने प्रवास करण्याच्या तयारीत असतानाच अचानक तिकीटासंदरभातील गोंधळ तुमच्यासोबतही झाला असेल. मात्र रेल्वेच्या चुकीमुळे झालेल्या गोंधळाविरुद्ध एका तरुणाने आवाज उठवला आणि निकाल चक्क या तरुणाच्या बाजूने लागला...
मध्य रेल्वेला ग्राहक आयोगाने दणका दिला असून मुंबईमधील के.सी. कॉलजेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला तब्बल 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेत. हे आदेश केरळमधील जिल्हा ग्राहक आयोगाने मध्य रेल्वेला दिले आहेत. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
तिकीट बुकिंग
झालं असं की, मुंबईतील केसी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचा विद्यार्थी असलेला यदुकृष्णन सी. याने तातडीने मूळ गावी जायचं असल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून केरळमधील कायमकुलम जंक्शनपर्यंत जाण्यासाठी नेत्रावती एक्सप्रेसचं रिझर्व्हेशन केलं होतं. मात्र त्याला कन्फॉर्म तिकीट मिळालेलं नव्हतं. सुरुवातीला त्याचे तिकीट वेटिंग लिस्टमधील 77 वरून RAC 44 वर आले होते.
रेल्वेने अचानक डबा बदलला अन्...
मात्र, रेल्वेने ट्रेनमधील थर्ड एसी डब्याऐवजी थर्ड एसी इकॉनॉमी डबा जोडला. या बदलामुळे आसन व्यवस्थेत फेरफार होऊन यदुकृष्णनचे आरएसी तिकीट अचानक वेटिंग लिस्ट 1 वर गेले. मात्र ट्रेन निघण्याच्या काही तास आधी तयार केलेल्या प्रवाशांच्या चार्टमध्ये त्याचं नाव नव्हतं. आपत्कालीन कारणासाठी प्रवास करणाऱ्या युदष्कृष्णनला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचे रेल्वे तिकीट परस्पर रद्द करण्यात आले.
जवळपास अडीच हजारांचा फटका
अचानक तिकीट रद्द झाल्यामुळे आणि तातडीने गावी जायचं असल्याने युदष्कृष्णनला त्याच ट्रेनचे दुसरे तिकीट घ्यावे लागले. मात्र त्यासाठी त्याला ₹2339 मोजावे लागले. तसेच जुन्या तिकिटाच्या परताव्यामधून रेल्वेने ₹65 क्लार्केज चार्जेस म्हणून कापून घेतले. म्हणजेच नवीन तिकीटाच्या पैशांबरोबरच रेल्वेच्या गोंधळामुळे काहीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आलेल्या तिकीटाशीसंबंधित शुल्कही प्रवाशाकडूनच घेण्यात आले. विशेष म्हणजे तिकीट रद्द करण्याची विनंती प्रवाशाने केलेली नसतानाही त्याला हा दुहेरी भुर्दंड सोसावा लागला.
ग्राहक आयोगाने काय सांगितलं?
केरळमधील मलप्पुरम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने या प्रकरणात मध्य रेल्वेला सेवेतील त्रुटी आणि अनुचित बिझनेस प्रॅक्टीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. ग्राहक विवाद निवारण आयोगाने सदर गोंधळासाठी रेल्वे दोषी असून त्यांनी रेल्वेलाच या प्रकरणात दोषी ठरवले. मात्र त्याचवेळी ज्या प्लॅटफॉर्मवरुन तिकीटं बूक केली जातात त्या आयआरसीटीसीचा यात काहीच दोष नसल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं. आयोगाने मध्य रेल्वेला प्रवाशाला झालेल्या मानसिक त्रासापोटी ₹20 हजार आणि न्यायालयीन खर्चापोटी ₹5000 अशी एकूण ₹25000 ची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.