विजयादशमीला रावणासोबत होणार झुरळ दहन, अनोखी परंपरा की राजकीय हेतू? आयोजकांनी स्पष्टच सांगितलं
दिल्लीतील पितमपुरा येथे विजयादशमीला रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत 30 फूट उंच झुरळाचा पुतळा जाळण्यात येणार आहे. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम असल्याचे आयोजक सांगतायत.
विजयादशमीला रावण दहनातून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश दिला जातो. मात्र, यंदा दिल्लीतील पितमपुरा येथील रामलीला कार्यक्रमात या परंपरेसोबत स्वच्छतेचा संदेशही जोडला जाणार आहे. श्री केशव रामलीला समितीने रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांसोबत 30 फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचे दहन करण्याची घोषणा केली आहे. ही अनोखी परंपरा आहे की राजकीय हेतूने प्रेरीत उपक्रम आहे? असा प्रश्न यानिमत्ताने उपस्थित होतोय. यावरही आयोजकांनी स्पष्टीकरण दिलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रावणासोबत झुरळाचाही पुतळा जाळणार
दिल्लीच्या पितमपुरा परिसरातील श्री केशव रामलीला समितीच्या मैदानावर यंदा हा वेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाणार आहे. त्यात यंदा 30 फूट उंच झुरळाच्या पुतळ्याची भर पडणार आहे. दसऱ्याच्या पारंपरिक कार्यक्रमात सामाजिक समस्यांचे प्रतीकात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे. झुरळाचा पुतळा रावणाच्या सैन्यातील असुरांच्या प्रतीकात्मक मांडणीतही समाविष्ट केला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष अशोक गोयल यांनी सांगितले.
झुरळाच्या पुतळ्यामागे स्वच्छतेचा संदेश
झुरळाचा पुतळा जाळण्यामागे घर, परिसर आणि समाजातील अस्वच्छतेविरोधात जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्वच्छ भारत आणि स्वच्छ दिल्ली या मोहिमांशी हा उपक्रम जोडण्यात आला आहे. विजयादशमी हा सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणारा सण आहे. याच विचारातून समाजातील समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष आणि मॉडेल टाउनचे आमदार अशोक गोयल देवराहा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
यापूर्वीही सामाजिक समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे
रामलीला कार्यक्रमात रावण दहनासोबत सामाजिक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे प्रतीक वापरण्याची पद्धत काही ठिकाणी पाहायला मिळते. अशोक गोयल यांनी यापूर्वी नक्षलवाद आणि दहशतवाद यांसारख्या समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळल्याचा उल्लेख केला आहे.यंदाच्या झुरळाच्या पुतळ्याच्या माध्यमातून अस्वच्छतेचा प्रश्न अधोरेखित करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
राजकीय हेतूने प्रेरित उपक्रम?
दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपीच्या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच झुरळाचा पुतळा जाळण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत राजकीय संदर्भातूनही चर्चा होत आहे. मात्र, आयोजकांनी हा निर्णय कोणत्याही राजकीय हेतूने घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.समितीच्या म्हणण्यानुसार, झुरळ हे अस्वच्छतेचे प्रतीक म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे असल्याचे आयोजक सांगतायत.