SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

घरासमोरच्या कार पार्किंगवरुन वाद! 22 सेकंदात एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं; थरार Video मध्ये कैद

दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये पार्किंगवरुन झालेला वाद एवढा विकोपाला गेला की एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. नेमकं झालं काय आणि आरोपी कोण आहे जाणून घ्या सविस्तर...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 07:26 AM IST | Updated: Oct 31, 2026, 07:32 AM IST
Image Credit: घरासमोरच घडला हा सारा प्रकार (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Join

उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार समोर आला असून कार पार्किंगसारख्या शुल्लक कारणावरुन गजबजलेल्या रस्त्यावर तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची भरदिवसा हत्या झाल्याने एकच दहशत पसरली असून या संपूर्ण घटनाक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेमका वाद काय होता?

ही घटना लखनऊमधील ओल्ड सिटी भागातील सआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नौबस्ता (ब्राह्मणी टोला) येथे घडली. सदर घटना सोमवार, 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली असली तरी तिचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषभ शुक्ला (वय साधारण 30 वर्ष) याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच तात्काळ अटक केली. ऋषभ शुक्ला हा पूर्वी मर्चेंट नेव्हीमध्ये नेव्हिगेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होता. मात्र त्याच्या रागीट स्वभावामुळे व भांडणांमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तो राज्यस्तरीय शूटर देखील राहिला होता अशी माहिती समोर आली आहे.  आरोपी ऋषभच्या घरासमोर एक वडाचे झाड आहे. त्या झाडाभोवती पूजेसाठी एक ओटा बांधण्याचे काम सुरू होते. यावरुन त्याचा शेजारी राहणाऱ्या तिवारी कुटुंबाशी वाद होता. तिवारी कुटुंबाचा ओटा बांधण्याला पाठिंबा होता, तर आरोपी ऋषभचा त्याला तीव्र विरोध होता. यावरून दीड महिन्यापूर्वीही त्यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता.

22 सेकंदात 5 गोळ्या

26 ऑक्टोबरच्या सकाळी तिवारी कुटुंबातील सुयश तिवारीने वादास कारणीभूत ठरत असलेल्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला बांधण्यात आलेल्या ओट्याशेजारी आपली कार पार्क केली. ऋषभने त्याच्या दुकानाच्या शटरवर 'नो पार्किंग'चा बोर्ड लावला होता, त्यामुळे गाडी उभी करण्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर शीघ्रकोपी असलेल्या ऋषभने घरातून अवैध पिस्तूल आणले. त्याने शेजाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अवघ्या 22 सेकंदात त्याने 5 गोळ्या झाडल्या. त्याने आधी शंभू आणि शिवाजी तिवारी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातून धावत आलेला तरुण सुयश तिवारी याला त्याने पायऱ्यांवरच अगदी जवळून गोळी मारली. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तिथेच बसून राहिला

हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला नाही, तर तो हातात पिस्तूल आणि मॅगझिन घेऊन मृतदेहांच्या शेजारीच बसून राहिला आणि मदत करायला येणाऱ्यांना धमकावत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपी ऋषभ शुक्लासह त्याच्या कुटुंबातील इतर 5 ते 6 जणांना अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा एक थरारक 23 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आरोपी गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहे.

दोन पोलीस निलंबित

पोलीस आयुक्तांनी या घटनेनंतर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलीस निरीक्षक आणि चौकी प्रभाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच लखनऊ विकास प्राधिकरणाने आरोपीच्या बेकायदेशीर घराचा भाग सील करून त्यावर पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि गृह सचिवांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले आहे.

मृतांची नावं आणि तपशील

1. शिवाजी तिवारी (वय 62 वर्ष): शिवाजी हे सचिवालयातील निवृत्त कर्मचारी होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह होते.
2. शिवेंद्र तिवारी ऊर्फ शंभू (वय 55 वर्ष): शिवाजी यांचे धाकटे बंधू असलेले शिवेंद्र हे लखनऊ विद्यापीठात कार्यरत होते.
3. सुयश तिवारी (वय 30 वर्ष): सुयश हा शिवाजी तिवारींचा मुलगा होता. त्याचा विजेच्या साहित्याचा व्यवसाय होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES