ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नवीन ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणात गेल्या महिन्याभरापासून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यात ठाणे पोलिसांवर दोन तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. या तरुणांच्या आरोपानंतर ठाण्यात एकच खळबळ माजली आहे.
राम पूर्णेकर या दोन तरुणांना घेऊन पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी आले होते. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना तरुणाने त्या दिवशी काय झालं याबद्दल सांगितलं. पीडित तरुण म्हणाला की, आम्हाला कापूरबावडी पोलीस ठाण्यात पकडून आणले. फक्त सांगण्यात आले होते, एका व्यक्तीचा फोटो दाखवला जाईल, त्याला ओळखता का याची तपासणी करायची आहे. त्यानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात आम्हाला आणले. आमची कपडे काढून अश्लील प्रकारे आम्हाला टॉर्चर केले. साध्या कपड्यांवरील व्यक्ती आम्हाला यायचे आणि बेदम मारहाण करायचे. अगदी पट्ट्यांनी मारहाण केली, असा आरोप तरुणांनी केला. राम पूर्णेकर यांनी सांगितले की, एका तरुणाच्या शरीराच्या चुकीच्या जागी पोलिसांनी बोट घातले. लघवीच्या जागेवर सूर्यफुल तेल लावण्यात आले. एका पोलिसाच्या पार्श्वभागात पोलिसांनी बोट घातले. आमच्या वकिलांनी पोलिसांना पत्र दिले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान, या पीडित तरुणाने आणि राम पूर्णेकरांनी केलेल्या आरोपांबाबत ठाणे पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आलेली नाहीय. पण प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना समर्थकांवरील कथित पोलीस अत्याचाराच्या आरोपांनी या वादाला वेगळं वळण लागलंय. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक चिघळत चाललं आहे.