उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार समोर आला असून कार पार्किंगसारख्या शुल्लक कारणावरुन गजबजलेल्या रस्त्यावर तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची भरदिवसा हत्या झाल्याने एकच दहशत पसरली असून या संपूर्ण घटनाक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नेमका वाद काय होता?
ही घटना लखनऊमधील ओल्ड सिटी भागातील सआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नौबस्ता (ब्राह्मणी टोला) येथे घडली. सदर घटना सोमवार, 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली असली तरी तिचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषभ शुक्ला (वय साधारण 30 वर्ष) याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच तात्काळ अटक केली. ऋषभ शुक्ला हा पूर्वी मर्चेंट नेव्हीमध्ये नेव्हिगेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होता. मात्र त्याच्या रागीट स्वभावामुळे व भांडणांमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तो राज्यस्तरीय शूटर देखील राहिला होता अशी माहिती समोर आली आहे. आरोपी ऋषभच्या घरासमोर एक वडाचे झाड आहे. त्या झाडाभोवती पूजेसाठी एक ओटा बांधण्याचे काम सुरू होते. यावरुन त्याचा शेजारी राहणाऱ्या तिवारी कुटुंबाशी वाद होता. तिवारी कुटुंबाचा ओटा बांधण्याला पाठिंबा होता, तर आरोपी ऋषभचा त्याला तीव्र विरोध होता. यावरून दीड महिन्यापूर्वीही त्यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता.
22 सेकंदात 5 गोळ्या
26 ऑक्टोबरच्या सकाळी तिवारी कुटुंबातील सुयश तिवारीने वादास कारणीभूत ठरत असलेल्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला बांधण्यात आलेल्या ओट्याशेजारी आपली कार पार्क केली. ऋषभने त्याच्या दुकानाच्या शटरवर 'नो पार्किंग'चा बोर्ड लावला होता, त्यामुळे गाडी उभी करण्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर शीघ्रकोपी असलेल्या ऋषभने घरातून अवैध पिस्तूल आणले. त्याने शेजाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अवघ्या 22 सेकंदात त्याने 5 गोळ्या झाडल्या. त्याने आधी शंभू आणि शिवाजी तिवारी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातून धावत आलेला तरुण सुयश तिवारी याला त्याने पायऱ्यांवरच अगदी जवळून गोळी मारली. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Waiting for the news when he will be encountered https://t.co/Uq3f1VEj7t
— Nilisha Mantri (@nilishamantri_) October 30, 2026
तिथेच बसून राहिला
हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला नाही, तर तो हातात पिस्तूल आणि मॅगझिन घेऊन मृतदेहांच्या शेजारीच बसून राहिला आणि मदत करायला येणाऱ्यांना धमकावत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपी ऋषभ शुक्लासह त्याच्या कुटुंबातील इतर 5 ते 6 जणांना अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा एक थरारक 23 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आरोपी गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहे.
दोन पोलीस निलंबित
पोलीस आयुक्तांनी या घटनेनंतर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलीस निरीक्षक आणि चौकी प्रभाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच लखनऊ विकास प्राधिकरणाने आरोपीच्या बेकायदेशीर घराचा भाग सील करून त्यावर पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि गृह सचिवांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले आहे.
मृतांची नावं आणि तपशील
1. शिवाजी तिवारी (वय 62 वर्ष): शिवाजी हे सचिवालयातील निवृत्त कर्मचारी होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह होते.
2. शिवेंद्र तिवारी ऊर्फ शंभू (वय 55 वर्ष): शिवाजी यांचे धाकटे बंधू असलेले शिवेंद्र हे लखनऊ विद्यापीठात कार्यरत होते.
3. सुयश तिवारी (वय 30 वर्ष): सुयश हा शिवाजी तिवारींचा मुलगा होता. त्याचा विजेच्या साहित्याचा व्यवसाय होता.