11 वीत शिकणारा बेपत्ता विद्यार्थी 26 वर्षीय शिक्षिकेसोबत सापडला; पोलिसांच्या छाप्यात दोघे हॉटेल रूममध्ये...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपासून बेपत्ता असलेला हा मुलगा संबंधित शाळेच्या मॅनेजरचाच मुलगा आहे. तो 21 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. या मुलाच्या वडिलांनी थेट शिक्षिकेवर आरोप केला. मात्र नंतर जे सत्य समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.
प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं किंवा प्रेम अंधळं असतं असंही म्हणतात. आता या दोन म्हणी आठवण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समोर आलेला एक अत्यंत विचित्र प्रकार! येथून बेपत्ता झालेला एक 15 वर्षीय मुलगा त्याच्याच शिक्षिकेसोबत एका हॉटेल रूममध्ये एकत्र सापडले आहेत. ही शिक्षिका 26 वर्षांची असून हे दोघेही लखनौमधील एका हॉटेलमध्ये एकत्र थांबले होते.
नेमका कुठे घडला हा प्रकार?
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज परिसरातील एका शाळेत शिकणारा हा 15 वर्षीय मुलगा इयत्ता अकरावीत शिकतोय. तो संबंधित शाळेच्या मॅनेजरचा मुलगा आहे. तिथेच शिकवणाऱ्या एका 26 वर्षीय शिक्षिकेसोबत तो 21 नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला. मुलगा घरी न परतल्याने त्याच्या वडिलांना काही गोष्टींची पूर्व कल्पना असल्याने त्यांनी थेट या महिला शिक्षिकेवर, 'तिने माझ्या मुलाला फूस लावून पळवून नेलं आहे, असा आरोप करत कप्तानगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दोघांना कसं शोधलं?
तक्रार दाखल करून घेण्यात आल्यानंतर, पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सर्व्हेलन्सच्या मदतीने दोघांचा माग काढला. 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप'च्या (SOG) मदतीने पोलिसांनी लखनौमधील एका हॉटेलवर छापा टाकला असता दोघेही एक रुम घेऊन राहत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आणि बस्ती येथे परत आणल्याची माहिती समोर आली आहे.
चौकशीत समोर आली खरी माहिती
सुरुवातीला मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी शिक्षिकेविरोधात अपहरण भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. चौकशीदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आलं. तसेच हे दोघे परस्पर संमतीने एकमेकांसोबत फिरण्यासाठी लखनौला गेल्याचे चौकशीत स्पष्ट झालं. मुलाचं अपहरण झालं नसून तो स्वखुशीने आपल्या शिक्षिकेसोबत गेला होता. त्यामुळे या शिक्षिकेला एकटीला दोषी धरता येणार नाही, असं तिच्यावतीने सांगण्यात आल्याचं समजतं.
मुलाला पालकांच्या स्वाधीन केलं
ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीसमोर विद्यार्थ्याने अपहरण आणि इतर आरोप फेटाळून लावल्याने, वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच, त्यानंतरच्या तपासात या प्रकरणातून पोक्सोची कलमे हटवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या तरुणीविरोधात आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.