₹10 च्या फाटलेल्या नोटेमुळे वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणाने गमावला जीव; हदारवणारा घटनाक्रम मृत्यूनंतर मोबाईलमधल्या Video तून समोर
या तरुणाच्या मृत्यूनंतर तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडीओमधून त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. नेमका घटनाक्रम काय आणि पोलिसांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
दिल्लीमध्ये स्वत:च्या 24 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच एका तरुण डिलेव्हरी बॉयने स्वत:ला संपवल्याची हदारवणारी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका 10 रुपयाच्या नोटेवरुन झालेल्या मारहाणीनंतर त्याने तणावामध्ये हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या तरुणाचा मंगळवारी विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यू झाला असून सदर प्रकरणामागील हादरवणारं कारण आणि संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.
तीन आठवड्यांनी घटनाक्रम समोर
सदर घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली असून तिचा तपशील जवळपास तीन आठवड्यांनी समोर आला आहे. 'फ्लिपकार्ट मिनिट्स'मध्ये काम करणाऱ्या समीर हुसेनला एका ग्राहकाने दिलेली 10 रुपयाची नोट फाटलेली होती. त्यामुळे त्याने ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. यावरुन त्याला ग्राहकाने कानशीलात लगावली. त्यानंतरच त्याने विष पिऊन स्वत:ला संपवलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी समीरवर हल्ला करणारा ग्राहक आणि त्याच्या शेजाऱ्याला अटक केली आहे.
नेमकं झालं काय?
पूर्व दिल्लीतील विनोद नगर येथे राहणारे 65 वर्षीय रामपाल सिंग यांनी 'फ्लिपकार्ट मिनिट्स'मधून एक कॉफीची बरणी मागवली होती. हीच डिलेव्हरी द्यायला गेला तेव्हा समीरसोबत काय घडलं हे त्याने स्वत:ला संपवण्याआधी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. हे व्हिडीओ पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. "मी तिथे पोहोचल्यानंतर त्यांना विचारले की ते पैसे रोख देणार आहेत की यूपीआयद्वारे पेमेंट करणार? ते नोटा गोळ करत होते. ते वयस्कर असल्याने मी 15 मिनिटं वाट पाहिली. त्यांनी मला दिलेल्या नोटांमध्ये 10 रुपयांची एक नोट फाटलेली होती. जेव्हा मी त्यांना ती बदलून देण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं," असं समीरने रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटल्याचं दिसत आहे.
मध्यमवर्गीय असल्यावरुन टोमणे अन् मारहाण
"त्यांनी मला सांगितले, 'एकतर ही नोट घे किंवा इथून नीघ, असं ते मला म्हणाले तेव्हा मी विचारले, 'जर तुमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही ऑर्डर का दिली?' यावर त्यांनी त्यांच्या राजकीय ओळखींची बढाई मारली आणि मला मारण्याची धमकी दिली," असंही समीरने अन्य एका व्हिडीओत क्लिपमध्ये म्हटलं आहे. पुढील घटनाक्रम सांगताना समीरने, तिथे थोड्या वेळात अन्य एक व्यक्ती आली. ही व्यक्ती ग्राहकाच्या शेजारी राहणार बंटी (30) नावाचा तरुण होता. त्याने समीरला तीन ते चार वेळा कानशीलात लगावल्या. त्याने समीरला 'मीडल क्लास' असल्याचा टोमणा मारला. "मी पोलिसांत तक्रार नोंदवली असून पुढे काय होईल याची मला कल्पना नाही," असं समीरने व्हिडीओत म्हटलं आहे.
बॅगेतून बाटली काढली अन्...
यानंतर समीरने व्हिडीओ ऑन ठेवूनच आपल्या बँगेतून एक बाटली काढली. त्याने त्या बाटलीत औषध असल्याचं म्हटलं. "जर मला पुढच्या 24 तासांत न्याय मिळाला नाही, तर मी हे पिऊन घेईन. माझ्या आत्मसन्मानाचा भूगा झाला आहे. तेव्हाच मला न्याय मिळेल," असं समीर व्हिडीओत म्हणाला. पुढे बोलताना समीरने त्याच्या आईला उद्देशून, "तुझा मुलगा खूप खंबीर आहे, पण हा समाज त्याला जगू देणार नाही," असं विधान केलं. त्यानंतर त्याने त्या बाटलीमधील द्रव्य प्यायला. पुढे त्याने, "मी आता मरणार आहे," असं म्हटलं.
काकांनी सांगितलं आम्हाला फोन आला होता
समीरने 5 ऑक्टोबर रोजी विष प्राशन करुन स्वत:ला संपवल्याचं त्याचे चुलते मोहम्मद शमी यांनी सांगितले. "त्याचे आई-वडील आणि मी दक्षिण दिल्लीतील जैतपूर परिसरातील खड्डा कॉलनीत राहतो. 5 ऑक्टोबर रोजी आम्हाला एक फोन आला आणि कळले की, त्याने उंदीर मारण्याचे विष खाल्लं असून त्याला लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. हे सारं घडलं तेव्हा त्याचे वडील झाकीर आजारी होते. म्हणूनच त्याने नोकरी स्वीकारली होती. त्याला आपल्या शिक्षणासाठी पैसे वाचवायचे होते," असं मोहम्मद शमी म्हणाले.
पोलिसांचं म्हणणं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रुग्णालयात समीरचा मृत्यू झाला.डीसीपी (पूर्व) राजीव कुमार यांनी सदर प्रकरणाबद्दल माहिती देताना, "तक्रार मिळाल्यानंतर आम्ही त्वरित एफआयआर नोंदवला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे," असं सांगितलं.