2 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचं हळूहूळू चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर हे वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत जाईल. 2 नोव्हेंबरला हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाला मुरासू असं नाव देण्यात आले आहे.'मुरासू'चा अर्थ नगारा असा आहे. महाराष्ट्रातील हवामानातही मोठ्या बदलाचा अंदाज. महाराष्ट्रासह 21 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. 4 राज्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, आसाम आणि सिक्कीम या 21 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर रोजी या 21 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. ताशी 90 KM च्या वेगाने वारे वाहणार आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट ओढावले आहे. मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकणातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMDने शनिवारी जाहीर केलेल्या मासिक हवामान अंदाजानुसार, राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे....नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची शक्यता आहे.