पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांच्याशी संबंधित एआय व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तपासाचा वेग वाढवलाय. दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स स्पेशल सेलचे पथक बिहारची राजधानी पटना येथील काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात पोहोचले. ‘सदाकत आश्रम’ या कार्यालयाबाहेर पोलिसांनी अधिकृत नोटीस लावली. बिहार काँग्रेसच्या अधिकृत X हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओच्या संदर्भात ही चौकशी सुरू आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
दिल्ली पोलिसांनी अमित कुमार मंडल यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 5 नोव्हेबर रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील काउंटर इंटेलिजन्स स्पेशल सेलच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देशही नोटिशीत आहेत.
पोलिसांनी संबंधित मोबाइल क्रमांकाचे सिमकार्ड तसेच 1 जुलै 2025 पासून या क्रमांकाचा वापर करण्यात आलेले सर्व मोबाइल हँडसेट सोबत आणण्यास सांगितले आहे. याशिवाय बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटचा वापर करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अकाउंट हाताळण्यास अधिकृत असलेल्या व्यक्तींची यादीही मागवण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुरुवात सप्टेंबर 2025 मध्ये झाली. बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर 10 सप्टेंबर 2025 रोजी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई यांच्यातील काल्पनिक संवाद दाखवण्यात आला होता. व्हिडीओमध्ये आई मुलाला बिहारमधील राजकारणावरून जाब विचारत असल्याचे चित्रण होते. या पोस्टवर भाजपने आक्षेप घेतला होता. काँग्रेसने मात्र व्हिडीओत पंतप्रधान किंवा त्यांच्या आईचा अपमान झालेला नसल्याची भूमिका मांडली होती.
सप्टेंबर 2025 मध्ये भाजपच्या दिल्ली निवडणूक विभागाचे संयोजक संकेत गुप्ता यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओ प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर 17 सप्टेंबर 2025 रोजी पटना हायकोर्टाने संबंधित एआय व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देश दिले होते. आता दिल्ली पोलिसांनी बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटच्या यूजर्सची माहिती मागवलीय.