EC चा महाराष्ट्रातील मतदार याद्यांसंदर्भात मोठा निर्णय, 6 राज्यांमध्ये होणार अंमलबजावणी; SIR ला विरोध होत असतानाच मोठ्या हालचाली
भारतीय निवडणूक आयोगाने 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती सादर करण्याच्या मुदतीत, तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुरु असलेला वाद आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले असतानाच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने सहा राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रियेची मुदत वाढवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हरियाणा, तेलंगणा, नागालँड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी अंतिम मतदार याद्या 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील, तर दिल्लीसाठी अंतिम मसुदा 22 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.
याआधी, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील 'विशेष सारांश पुनरीक्षण' प्रक्रियेबाबत, विशेषतः 'फॉर्म-6' (Form-6) संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एसआयआर प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती सादर करण्याची मुदत, तसेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
दावे आणि आक्षेप निकाली काढण्याच्या तारखांमध्ये बदल
दावे आणि आक्षेप निकाली काढण्याची अंतिम तारीख हरियाणा आणि आंध्र प्रदेशसाठी 20 नोव्हेंबर, महाराष्ट्र आणि नागालँडसाठी 25 नोव्हेंबर, तेलंगणासाठी 26 नोव्हेंबर आणि दिल्लीसाठी 15 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना या सुधारित वेळापत्रकांचा व्यापक प्रसार सुनिश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हरियाणात, दावे आणि आक्षेप सादर करण्याचा कालावधी 31 जुलै 2026 ते 20 नोव्हेंबर 2026 असा असेल. अंतिम प्रकाशन 30 नोव्हेंबर रोजी केले जाईल.
नागालँडमध्ये दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून, अंतिम मसुदा 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला जाईल. आंध्र प्रदेशमध्ये दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर 2026 आहे आणि अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. महाराष्ट्रामध्ये दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर आहे, तर त्या निकाली काढण्याची तारीख 25 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे; अंतिम मसुदा 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला जाईल.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून, भारतीय निवडणूक आयोगाने एनसीटी (NCT) दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेअंतर्गत, दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. या प्रक्रियेसाठी पात्रतेची तारीख 1 ऑक्टोबर 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.