मंदिरामध्ये मिळायचं लोन, शालेय इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख; मंदिरांचं मशिदीमध्ये रूपांतर झाल्याचाही दावा
12 व्या शतकानंतर अनेक मंदिरे आणि मठांची तोडफोड करण्यात आली किंवा त्यांचे मशिदीमध्ये रूपांतर झाले. मात्र, या आक्रमणांनंतरही मंदिरांचे पुनर्निर्माण आणि नवीन बंधकामे सुरूच राहिली, असा उल्लेख पुस्तकात आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'अंडरस्टैंडिंग सोसायटी इंडिया अँड बियाँड पार्ट 2' या पाठ्यपुस्तकातील 'रेजिस्टन्स अँड रेसिली अन्स (1000-1700 सीई)' या प्रकरणात पुरातन मंदिरांसंदर्भात केलेला दावा सध्या चांगलाच चर्चेत आहे.इसवी सन 1000 ते 1700 या कालखंडात मंदिरे ही केवळ पूजेची ठिकाणे नसून, ती मोठी आर्थिक केंद्र आणि राजकीय सत्तेला कायदेशीर मान्यता मिळवून देणारे मुख्य आधारस्तंभ होती, असा दावा 'एनसीईआरटी'ने तयार केलेल्या इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.
राजकीय जीवनाचा मुख्य आधारस्तंभ
नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी, मंगळवारी 'अंडरस्टैंडिंग सोसायटीः इंडिया अँड बियॉन्ड - भाग 2' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग जूनमध्ये प्रकाशित झाला आहे. या पुस्तकानुसार, "मंदिरे ही त्या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक आणि राजकीय जीवनाचा मुख्य आधारस्तंभ होती. ही धार्मिक केंद्रे कालांतराने प्रमुख आर्थिक केंद्रस्थानी रूपांतरित झाली, ती मोठ्या प्रमाणावरील जमिनींच्या देणग्यांचे व्यवस्थापन करत, शेकडो कुशल कामगारांना रोजगार पुरवत आणि स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आर्थिक संस्था म्हणूनही कार्य करत." असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.
कर्ज पुरवठा करणारी वित्तीय संस्था
आर्थिक दृष्टिकोनातूनही मंदिरे अत्यंत सक्षम संस्था म्हणून उदयास आली होती. मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या जमिनी, दान आणि अनुदानांमुळे मंदिरे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि ग्रामसभांना कर्ज पुरवठा करणारी वित्तीय संस्था बनली होती. वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार, पुजारी, संगीतकार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मंदिरांमधून मोठा रोजगार मिळत असे. याशिवाय कर वसुली आणि स्थानिक पातळीवर न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही मंदिरांकडे होते, असे त्यात म्हटले आहे.
'जगदीशांचे मंदिर मुघल सत्तेला उत्तर'
पुस्तकात नमूद केल्यानुसार, 11 व्या शतकापासून गड़ानवी व घुरी आक्रमणांदरम्यान, तसेच 12 व्या शतकानंतर अनेक मंदिरे आणि मठांची तोडफोड करण्यात आली किंवा त्यांचे मशिदीमध्ये रूपांतर झाले. मात्र, या आक्रमणांनंतरही मंदिरांचे पुनर्निर्माण आणि नवीन बंधकामे सुरूच राहिली. अमेर येथील जगत शिरोमणी मंदिर आणि उदेपूरमध्टो महाराणा जगत सिंग यांनी बांधलेले जगदीशांचे मंदिर ही या धार्मिक आणि राजकीय पुनरुत्यानाची प्रमुख उदाहरणे आहेत. शाहजहानच्या काळात दिल्लीत बांधल्या गेलेल्या जामा मशिदीच्या पार्श्वभूमीवर, महाराणा जगत सिंग यांनी उभारलेले जगदीशांचे मंदिर हे मुघल सत्तेला दिलेले एक धार्मिक आणि राजकीय उत्तर मानले जाते.
'वैयक्तिक आयकर' विषयाचा समावेश
"एनसीईआरटी'ने पहिल्यांदाच इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात 'वैयक्तिक आयकर' या विषयाचा समावेश केला आहे. 'मॅनेजिंग युअर पर्सनल फायनान्सेस' या अध्यायांतर्गत हा विषय समाविष्ट करण्यात आला असून, प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणे हे देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे म्हणटले आहे. 'एनसीईआरटी'चे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वयोगटातील विद्याथ्यर्थ्यांसाठी प्रथमच नवीन कर प्रणालीनुसार टप्प्याटप्प्याने कराची प्रत्यक्ष गणना समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अध्यावात जुन्या कर प्रणालीचा कोणताही उल्लेख नसून केवळ नवीन कर प्रणालीचा समावेश आहे.