EPFO चा मोठा बदल! 32000 पगार असणाऱ्यांची पेन्शन वाढणार? मोठी अपडेट समोर!
जुनी 15 हजार रुपयांची मर्यादा आणि नवी 25 हजार रुपयांची मर्यादा यांची तुलना केल्यास वेतन मर्यादेत सुमारे 66.7 टक्क्यांची वाढ होते.
खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) यांच्याशी संबंधित वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये प्रतिमहिना करण्यात आल्याचे वृत्त आहे. या बदलामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या पेन्शन गणनेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः 32 हजार रुपये पगार आणि 20 वर्षांचा सेवाकाल असलेल्या कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
वेतन मर्यादा 15 हजारांवरून 25 हजार रुपये
सरकारने ईपीएफ आणि ईपीएसशी संबंधित वेतन मर्यादा 25 हजार रुपये प्रतिमहिना केली आहे. यामुळे पूर्वीच्या मर्यादेपेक्षा जास्त वेतन मिळणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत येण्याची संधी मिळू शकते.मात्र, सदस्यत्वाची पात्रता, यापूर्वीचे ईपीएस सदस्यत्व आणि लागू नियम महत्त्वाचे आहेत.
पेन्शनची गणना नेमकी कशी होते?
ईपीएस पेन्शनची सर्वसाधारण गणना पुढील सूत्रानुसार केली जाते.मासिक पेन्शन = (पेन्शनसाठी ग्राह्य वेतन × पात्र सेवाकाल) ÷ 70. पेन्शनसाठी ग्राह्य वेतन सामान्यतः निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 60 महिन्यांच्या सरासरी वेतनावर आधारित असते. पात्र सेवाकाल म्हणजे कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ग्राह्य धरली जाणारी सेवा. नियमांनुसार, २० वर्षे किंवा त्याहून अधिक पात्र सेवा पूर्ण करणाऱ्या सदस्यांसाठी गणनेत दोन वर्षांचे अतिरिक्त सेवा-वजन धरले जाऊ शकते.
32 हजार रुपये पगार आणि 20 वर्षांची नोकरी: किती पेन्शन?
जागरणच्या वृत्तात ३२ हजार रुपये ग्राह्य वेतन आणि 22 वर्षांचा गणनेसाठीचा सेवाकाल धरून पेन्शन 10057 रुपये असल्याचे नमूद केले आहे. मात्र, हा आकडा 32000× 22 ÷ 70 या गणनेवर आधारित आहे. तो प्रत्येक कर्मचाऱ्याला लागू होईलच असे नाही. उदाहरणार्थ, जर 25 हजार रुपये ही वेतन मर्यादा संबंधित कर्मचाऱ्याला लागू झाली आणि २२ वर्षांचा गणनेसाठीचा सेवाकाल ग्राह्य धरला, तर गणना अशी होईल: (25000 × 22) ÷ 70 = सुमारे 7857 रुपये प्रतिमहिना.हा केवळ उदाहरणार्थ केलेला हिशेब आहे.
पेन्शनमध्ये 65 टक्क्यांहून अधिक वाढ कशी मोजली जाते?
जुनी 15 हजार रुपयांची मर्यादा आणि नवी 25 हजार रुपयांची मर्यादा यांची तुलना केल्यास वेतन मर्यादेत सुमारे 66.7 टक्क्यांची वाढ होते. उदाहरणार्थ, 22 वर्षांचा गणनेसाठीचा सेवाकाल धरल्यास १५ हजार रुपये वेतनावर पेन्शन सुमारे 4714 रुपये, तर 25 हजार रुपये वेतनावर सुमारे 7857 रुपये होते. या उदाहरणात मासिक फरक सुमारे 3143 रुपये आहे. मात्र, हा हिशेब केवळ दोन्ही वेतन मर्यादा संबंधित कर्मचाऱ्याला लागू झाल्यासच उपयोगी ठरतो.
कंपनीचे योगदान आणि कर्मचाऱ्यांनी काय तपासावे?
सामान्य योगदान पद्धतीनुसार, नियोक्त्याच्या लागू योगदानातील 8.33 टक्के हिस्सा ईपीएसकडे वळवला जातो आणि उर्वरित हिस्सा ईपीएफ खात्यात जमा होतो. संबंधित वेतन मर्यादा 25 हजार रुपये असल्यास 8.33 टक्क्यांनुसार ईपीएसमधील योगदान सुमारे 2083 रुपये होऊ शकते; मात्र प्रत्यक्ष योगदान पात्रता आणि लागू नियमांवर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनपत्रकातील वेतन, पीएफ योगदान, ईपीएस सदस्यत्व आणि सेवाकाल तपासावा. योगदानात त्रुटी असल्यास प्रथम नियोक्त्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रश्न सुटला नाही तर ईपीएफओच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार करता येते.