टिपू सुलतानला धर्मांध, क्रूर का म्हटलं जातं? ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? समजून घ्या 20 मुद्द्यांमधून
एक बाजू म्हणते टिपू सुलतान ब्रिटिशांसोबत स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी लढल्याने तो स्वातंत्र्यसेनानी होता. तर दुसऱ्या बाजुच्या लोकांचं असं म्हणणं असतं की, टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, कत्तली केल्या, धर्मांतरं घडवून आणली त्यामुळे तो धर्मांध आणि क्रूर होता, असं म्हणतात. मात्र यासंदर्भातील ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
वर्ष 1797.... मराठ्यांचं दिल्लीतील वर्चस्व आणि दख्खनमधलं मराठा साम्राज्य उखडून फेकण्यासाठी अफगाणिस्तानच्या शासकाला भारतातलाच एक सुलतान प्रस्ताव देतो... हा प्रस्ताव काय आहे, कोणी दिला ते या आपण पुढे बघणार आहोतच. पण महाराष्ट्रात इतिहास, ऐतिसासिक विषय, किंवा इतिहासातील पात्र यावरुनचे वाद नवे नाहीयेत. पण सध्या इतिहासातल्या एका अशा व्यक्तिरेखेवरुन वाद सुरु आहे जी मुळात महाराष्ट्रातली नसून राज्याबाहेरची आहे. आपण या ठिकाणी बोलतोय टीपू सुल्तानबद्दल..
गेल्या काही महिन्यांपासून टिपू सुलतानबाबत महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात वेगवगेळे वाद प्रवाद बघायला मिळतायत. यात प्रामुख्याने दोन बाजू आहे. एक बाजू म्हणते टिपू सुलतान ब्रिटिशांसोबत स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी लढल्याने तो स्वातंत्र्यसेनानी होता. तर दुसऱ्या बाजुच्या लोकांचं असं म्हणणं असतं की, टिपू सुलतानने हिंदूंवर अत्याचार केले, कत्तली केल्या, धर्मांतरं घडवून आणली त्यामुळे तो धर्मांध आणि क्रूर होता. आता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा या सगळ्या चर्चा होतात. आता असे आरोप होण्यामागचं कारण नेमकं काय आहे, टिपूच्या शासनकाळात असं खरच काही घडलं का, त्याचे संदर्भ काय आहे त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे फक्त व्हॉट्स एप किंवा फेसबुकवरच्याच चर्चा बघून मत न बनवता इतिहासतले मूळ अस्सल संदर्भ आपण बघणार आहोत.
1) यातला पहिली गोष्ट आपण बघूयात ती म्हणजे मराठे आणि टिपू सुलतान यांच्यातले संबंध कसे होते. काही ठराविक भूभागांवरुन मराठे आणि टिपूमध्ये संघर्ष सुरुच होता. 1787 मध्ये टीपूला गजेंद्रगड तहानुसार मराठ्यांना 48 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागली होती. पण हा तह होऊन सुद्धा टिपूने कित्तूर पुन्हा ताब्यात घेतलं.
2) टिपूबाबत दुसरा महत्वाचा संदर्भ 1784 चा आहे. या वर्षी नाना फडणीस आणि महादजी शिंदे यांच्यात पत्रव्यवहार झाला. या पत्रात टिपू अहंकाराने भरलेला असून त्याने अनिकडेच नूर मोहम्मदला एक पत्र लिहीलं आणि त्यात टिपूने 50 हजार हिंदू, ज्यात महिला लहान मुलांचा समावेश होता त्यांचं जबरदस्ती धर्मांतर केलं. टिपूला पूर्वी कुठल्याही पादशहाने किंवा वजीराने न केलेलं कृत्य म्हणून अभिमानाने हे सांगत होता. तो संपूर्ण खेडीच्या खेडी धर्मांतरीत करतो. असा सगळा उल्लेख या समकालीन पत्रात आहे.
3) आता तिसऱ्या नोंदीकडे येऊयात. टिपूच्या सैन्याने 1785 मध्ये नरगुंदच्या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी नरगुंदचे किल्लेदार होते मराठा सरदार काळोपंत पेठे. आपल्या कुटुंबाला काही इजा करु नये या अटीवर पेठेंनी किल्ला टिपूच्या स्वाधिन केला. पण टिपूने काळोपंत पेठ्यांना कैद केलं आणि त्यांच्या सुंदर आणि विवाहीत मुलींना धर्मांतरीत करुन त्यांची रवानगी जनानखान्यात करण्यात आली. नंतर काळोपंत पेठेंचाही कोठडीत मृत्यू झाला. निशान ए हैदरीचं इंग्रजी भाषांतर असलेल्या हिस्टरी ऑफ रेईन ऑफ टिपू सुल्तान, डब्ल्यु मील्स यांच्या पान क्रमांक 65 वर हा संदर्भ आहे.
4) आता चौथ्या क्रमांकावर येतो सर्वात महत्वाचा पुरावा आणि एक संदर्भ ज्यामुळे अनेकांचे डोळे खाडकन उघडतील. छत्रपती शिवरायांनी ज्या मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि ज्या मराठ्यांनी बलिदान देत दिल्लीवर प्रभुत्व मिळवलं ते मराठा साम्राज्यच टिपूला नेस्तनाबूत करायचे होते. हे मी नाही म्हणत तर टिपूच एका पत्रात हे सांगतो. मराठ्यांचं पानिपत करणाऱ्या अब्दालीचा नातू अफगाणिस्तानचा शासक झमन शाह दुर्राणीला टिपू सुल्तानने 5 फेब्रुवारी 1797 रोजी एक प्रस्ताव दिला. त्यात, "दिल्लीचं तख्त काफिर मराठ्यांच्या तावडीत आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी इस्लामसाठी एकत्र येत काफिरांना नष्ट करावं. दिल्लीकडे कुच करावी आणि मुघल सम्राटाला पदच्यूत करुन मग दख्खनकडे कूच करुन जिहाद करावा तसच काफिरांना इस्लामच्या तलवारीखाली झुकवावं," अशी विनंती टिपूने अफगानच्या शासकाला केली. यातलं दख्खन म्हणजे महाराष्ट्र. मराठा साम्राज्यच मुळापासून नष्ट करण्याचे टिपूचे मनसुबे असल्याचं या पत्रात दिसतं. ऑफिशियल डॉक्युमेंट्स रिलेटिव्ह टु द निगोसिएशन कॅरिड बाय टिपू विथ अदर स्टेट्स या संग्रहातील डॉक्युमेंट नंबर 22 आणि पान नंबर 62-63 वर हा उल्लेख आहे. तसच गजानन मेहेंदळेंच्या 'टिपू: अॅज ही रिअली वॉज' यातही पुस्तकात या प्रस्तावाचा उल्लेख आहे. टिपूने राजदूताकरवी पाठलेला हा प्रस्ताव बघितला तर एका परकीय शासकाला टिपू भारतावर आक्रमणासाठी उद्युक्त करत होता. मग अशी व्यक्ती देशभक्त असू शकते का? ते तुम्ही ठरवा. तर हे होतं मराठे, मराठा साम्राज्य आणि टिपूमधले संबंध अधोरेखित करणारे मोजके संदर्भ.
5) 1782 ते 1799 या दरम्यान टिपू सुल्तानने तेव्हाच्या कॉन्स्टनटिनोपल म्हणजेच तुर्की साम्राज्याच्या सुलतानासोबत पत्रव्यवहार केला होता. यात मलबारमधील हिंदूंना पकडण्याचा आदेश, 242 नायर कैद्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याचं टिपूने म्हटलंय. तसच कुर्गमधल्या हिंदूंना म्हैसूरमध्ये नेऊन धर्मांतरीत केल्याचाही उल्लेख आहे. सर्वात गंभीर म्हणजे 19 जानेवारी 1790 मधल्या पत्रात मलबारमधल्या चार लाख हिंदूंचं धर्मांतर केल्याचाही दावा टिपूने केलाय. त्यानंतर 10 फेब्रुवारी 1799 ला पाठवलेल्या पत्रात सुमारे पाच लाख जणांचं इस्लाममध्ये धर्मांतरण केल्याचाही दावा टिपूने पत्रातून केलाय.
6) टिपूबद्दल सहावा संदर्भ आहे विलियम कर्कपॅट्रीक यांच्या 'सिलेक्टेड लेटर्स ऑफ टिपू सुलतान' या 1811 मधील पत्रसंग्रहातला. त्यात 14 डिसेंबर 1788 ला टिपूने मलबारमधील आपला लष्करी अधिकारी मीर हुसैन अली खान याला पत्र पाठवून हिंदूंना पकडण्याचे, काहींना कैदेत ठेवण्याचे आणि इतरांना ठार मारण्याचा आदेश दिला.
7) आता टिपूबद्दल सातवा विश्वसनीय संदर्भ आहे टिपूच्या दरबारतलाच! टिपूकडे दिर्घकाळ काम केलेले कर्मचारी रामचंद्र राव पंगानुरीने 'मेमॉईर्स ऑफ हैदर अँड टिपू मध्ये- रुलर्स ऑफ श्रीरंगपट्टणम' नावाचं पुस्तक लिहीलं. ते 1849 ला चार्ल्स ब्राऊन यांनीा इंग्रजीत प्रकाशित केलं. त्यात टिपूने कोइंबतूरचे व्यंकटरमण मंदिर उध्वस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर पान नंबर 48 , सेक्शन 37 मध्ये टिपूने बाळापूर आणि नंदीगडला स्वारी केली आणि तिथल्या देवळातली पार्वतीची मूर्ती लाथ मारुन फोडली असा उल्लेख आहे.
8) आठवा संदर्भ आहे टिपूने उध्वस्त केलेल्या मंदिरांबद्दलचा! 1789 मधल्या मलबार मोहिमेत, "मी 8 हजार मंदिरं पाडली" असे उद्गार स्वतः टिपूने काढल्याचा उल्लेख लेवीस राईस यांच्या मैसुर गॅझेटियरमध्ये आहे.
9) टिपूबाबत आता नववा संदर्भ 1789 मधलाच आहे. या वर्षी टिपूने चर्च आणि देवळं जाळली, लोकांना हत्तीच्या पायाला बांधून ठार केलं असा उल्लेख बार्तोलोमिओ या पोर्तुगीज पाद्रीने 'अ वोयाग टुद इस्ट इंडिज' या नोंदीत पान क्रमांक 141 वर केलाय.
10) मलबारमध्ये पोन्नानी इथलं दुर्गभगवतीचं देऊळ टिपू सुलतानने नष्ट केलं आणि मुर्ती फोडली. त्यानंतर चिरक्कल तालुक्यातील तलीपरंबा इथलं शंकराचं मंदिर टिपूने पाडलं असा उल्लेख 'मलबार मॅन्युएल' या ब्रिटीशांच्या प्रशासकीय नोंदीतील व्हॉल्युम दोन मध्ये आहे.
11) उडुपी जवळच्या हिरियडका इथली शक्ती देवीची मूर्ती आणि इतर अनेक मुर्ती वितळवून टिपू सुलतानने त्याची नाणी पाडली आणि तोफा बनवल्या असा उल्लेख फ्रांसिस बुखानन यांच्या 'अ जर्नी फ्रॉम मद्रास थ्रु सेंच्युरीज ऑफ मैसुर' यातील खंड 3 आणि पान क्रमांक 89 वर आहे.
12) 1790 मध्ये पारुरमधील वेंकटाचलपतीचं मंदिर टिपूने पाडलं असा उल्लेख केरला डिस्ट्रीक्ट गॅझेटियरच्या पान क्रमांक 864 वर आहे.
13) केरळच्या वायनाड जिल्ह्यातील सुलतान बॅटरी इथलं गणपतीचं मंदिर टिपू सुलतानने पाडल्याचा उल्लेख केरला गॅझेटियरच्या खंड 2 , पान क्रमांक 231 वर आहे.
14) टिपू सुलतानच्या क्रोर्याबद्दल आणखी एक संदर्भ सापडतो तो 1791 मधल्या त्याच्याच आज्ञेच्या रुपाने. इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांच्या अभ्यासानुसार 8 जून 1791 ला श्रीरंगपट्टणचा अधिकारी मुहम्मद सुदूरला लिहीलेल्या पत्रात टिपू म्हणतो की, "जेवढे काफिर मारले जातील ते सर्व नरकाच्या आगीत जातील. बाकी जे सापडतील मग त्यात लहान मुलं, तरुण किंवा म्हातारे असो. त्यांचं खच्चीकरण करा. जेणेकरुन काफिरांचा वंश पुढे वाढणार नाही." यामुळे मुस्लिमेतरांबद्दल टिपूच्या मनात काय भावना होत्या ते लक्षात येतं.
15) इतकंच नाही तर केट ब्रिटलबँक यांच्या टिपूवर 1997 साली लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी काही संदर्भाच्या आधारे टिपुने हरिहरमधील हरिहरेश्वर मंदिर, श्रीरंगपट्टणनमधील वराहस्वामी मंदिर आणि होस्पेटमधील ओडकराया मंदिर सुद्धा उध्वस्त केल्याचा उल्लेख आहे.
16) रॉडरिक मॅकेन्झी यांच्या 1793 मधील वृत्तांतानुसार 1790 मधील तिरुवन्नामलई जवळ मोहिमेदरम्यान टिपूने मंदिरामध्ये घुसून मूर्ती आणि मालमत्तेची नासधूस केल्याचं लिहून ठेवलंय.
17) आता टिपूबद्दल 17 वा ऐतिहासिक संदर्भ आहे तो त्याने केलेल्या धर्मांतराबद्दल! 1786 मध्ये कूरनुलचा नवाब रनमस्त खान याला टिपूने जे पत्र लिहीलं त्यात 40 हजार कोडवा हिंदूंना कैद करुन धर्मांतरित केल्याचा उल्लेख आहे. 'सिलेक्टेड लेटर ऑफ टिपू सुलतान' या पत्रसंग्रहात हे पत्र आहे.
18) याच पत्रसंग्रहात पान क्रमांक 406 वर टिपूने बंगलोरमध्ये एक मंदिर पाडून ती जागा दर्ग्याला दिल्याचा उल्लेख आहे.
19) टिपूवर क्रूर आणि धर्मांधतेचा आरोप होण्यामागे आणखी एक समकालीन संदर्भ आहे. जेम्स स्करी नावाचा एक ब्रिटीश व्यक्ती दहा वर्ष टिपूच्या कैदेत होता. तिथून मुक्त झाल्यावर त्याने 'द कॅप्टिविटी, सफरींग, अँड एस्केप ऑफ जेम्स स्करी' हे वर्णन लिहीलं जे 1824 मध्ये ते प्रकाशिक झालं. त्यात जेम्स म्हणतो, "टिपू कैद्यांना जबरदस्तीने खतना करुन मुस्लिम बनवत होता." स्करीचं सुद्धा जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. टिपूच्या सैन्याने 30 हजार ख्रिश्चनांना श्रीरंगपट्टणमला आणून जबरदस्ती मुस्लिम बनवलं.त्यांच्या मुलींना जनानखान्यात टाकलं. तसेच ज्यांनी मुली द्यायला नकार दिला त्या पुरुषांचे नाक कान आणि वरचे ओठ कापले. तसेच त्यांना गाढवावर उलटं बसवून फिरवलं गेलं. यात एक जण ब्लिडींग झाल्याने जागेवरच मरण पावला. टिपूने काही मंदिरांचा वापर तुरुंग म्हणून सुरु केल्याचंही यात लिहीलं आहे.
20) टिपूबद्दलच्या एका मिथकाबद्दल सांगायचं झालं तर, टिपू सुलतानने त्रावणकोरमधल्या महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार दिला अशी एक माहिती कायम सोशल मीडियावर बघायला मिळते. पण असा दावा करण्यासाठी कुठलाही ऐतिहासिक आधार उपलब्ध नाही. मुळात टिपूच्या मृत्यूनंतर 1859 मध्ये तत्कालिन राजे उत्तम थिरुनाल मार्तंड यांनी नादर महिलांना स्तन झाकण्याची परवागनी देणारी राजाज्ञा काढली.
तर हे होते टिपू सुलतानला धर्मांथ आणि क्रूर म्हणण्यापाठीमागचे काही संदर्भ. ऐतिहासिक उल्लेख आणि नोंदी. तसे आणखी बरेच संदर्भ आहेत. पण त्यातले काही मोजकेच आणि समकालीन उल्लेख आपण घेतले आहेत. जेणेकरुन टिपुबद्दल असं का बोललं जातं हे आपल्याला कळावं. याच नोंदींमुळे टिपू सुलतानची ही एक बाजू इतिहासात काळ्या अक्षरात लिहीली आहे. अर्थात दस्तावेज हेच सांगतात. त्यामुळे कुठल्याही बाबीला एका विशिष्ट दृष्टीकोणातून बघण्यापेक्षा ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीकोणातून बघणं हे तर्काच्या आधारावर टिकणार असतं. कारण त्याचा पाया हा सत्यावर आधारलेला असतो. हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.
(संकलन - सौरभ कोरटकर)