धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...
जामा मशिद पोलीस ठाण्यात चाकूहल्ला झाला असून, या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पोलिसांवरच चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा चाकूहल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीनेच हा हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फरार झालेल्या आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
झालं असं की, नबील नावाच्या व्यक्तीला कौटुंबिक वादाच्या तक्रारीसंदर्भात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्याचा त्याची आई आणि बहिणीसोबत वाद सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी सुरु असतानाच त्याने अचानक पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्या चेहरा आणि मानेवर दुखापत झाली आहे. जखमींना सुरुवातीला संजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले.
हल्ल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यातून पळून गेला. पळून जाण्यासाठी त्याने दुचाकीही लुटली. दरम्यान, सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या ऑपरेशन्स युनिटने आरोपीचा छितली कबर परिसरात माग काढला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आरोपीने पुन्हा पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांवर पुन्हा हल्ला; गोळीबारात आरोपी जखमी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडून निर्माण झालेला गंभीर धोका असूनही, अधिकाऱ्यांनी संयम राखला आणि कारवाई केली. आरोपीला नियंत्रणात आणण्यासाठी नियंत्रित गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये सर्व गोळ्या कमरेच्या खाली मारण्यात आल्या. एकूण आठ राऊंड फायर करण्यात आले, ज्यापैकी सहा गोळ्या आरोपीच्या पायाला लागल्या. गोळीबारानंतर, आरोपीला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, नबील नावाच्या या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. 2022 मध्ये त्याच्याविरुद्ध दयालपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, जामा मशीद आणि चांदनी महल पोलीस ठाण्यांतही संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे नोंदवले जात आहेत. या घटनेत एकूण नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.