December School Holidays:ख्रिसमस ते विंटर व्हेकेशनपर्यंत, शाळांना किती दिवस सुट्टी? महाराष्ट्रासह राज्यनिहाय यादी!
डिसेंबर 2026 मध्ये शाळांना किती दिवस सुट्टी असणार? उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील हिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाणून घ्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची अपडेट समोर येतेय.
नोव्हेंबर महिना संपत आला असून डिसेंबरमध्ये शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे नियोजन पालक आणि विद्यार्थ्यांकडून सुरू होईल. वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसची सुट्टी असतेच. त्याशिवाय उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीमुळे हिवाळी सुट्ट्याही जाहीर केल्या जातात. असे असले तरी संपूर्ण देशात शाळा एकाच वेळी बंद राहणार नाहीत. प्रत्येक राज्याच्या शिक्षण विभागाचे वेळापत्रक आणि स्थानिक परिस्थितीनुसार सुट्ट्यांच्या तारखा वेगळ्या असू शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशात 15 दिवसांची हिवाळी सुट्टी
उत्तर प्रदेशातील बेसिक शिक्षण परिषदेच्या नियंत्रणाखालील आणि मान्यताप्राप्त शाळांसाठी 31 डिसेंबर 2026 ते 14 जानेवारी 2027 या काळात हिवाळी सुट्टी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग 15 दिवस सुट्टी मिळणार आहे. 15 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होण्याचे नियोजन आहे. खासगी शाळांचे वेळापत्रक वेगळे असू शकते.
बिहारमध्ये 25 डिसेंबरपासून सुट्टी
बिहारमधील सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांच्या 2026 च्या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार, 25 ते 31 डिसेंबरदरम्यान हिवाळी सुट्टी असणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना सलग सात दिवस शाळेत जाण्याची गरज नाही. 1 जानेवारी 2027 पासून शाळा पुन्हा सुरू होण्याचे वेळापत्रक आहे.
दिल्लीत जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात शाळा बंद
दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 1 ते 15 जानेवारी 2027 या काळात हिवाळी सुट्टी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 15 दिवसांची विश्रांती मिळेल. 16 जानेवारीपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या आसपासची सुट्टी मात्र शाळांच्या स्वतंत्र वेळापत्रकानुसार असेल, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी.
राजस्थानमध्ये 11 दिवसांची सुट्टी
राजस्थानच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार 31 डिसेंबर 2026 ते 10 जानेवारी 2027 या काळात हिवाळी सुट्टी नियोजित आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा विचार करून वर्गांनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काश्मीर विभागात पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 14 डिसेंबर 2026 ते 22 फेब्रुवारी2027 या काळात सुट्टी असणार आहे.
महाराष्ट्रातील पालकांना आवाहन
महाराष्ट्रात डिसेंबरमधील 25 तारखेला ख्रिसमसची सार्वजनिक सुट्टी आहे. काही शाळा आणि शैक्षणिक मंडळांच्या स्वतंत्र कॅलेंडरमध्ये डिसेंबरअखेरीस ते जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत सुट्टी असू शकते. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे किंवा राज्यातील इतर भागांतील पालकांना आपल्या शाळेचे अधिकृत परिपत्रक तपासण्याच आवाहन करण्यात आले आहे. सुट्टीचे नियोजन करण्यापूर्वी शाळा प्रशासनाकडून पुन्हा एकदा तारखांची खात्री करून घेणे योग्य ठरणार आहे.