HDFC चा गोपनीय डेटा लीक! अंतर्गत चौकशीत धक्कादायक खुलासे, बँकेचे कर्मचारीच बाहेरील व्यक्तींना...
बाजारातील मूल्याच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) अंतर्गत चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती लीक केल्याचे उघड झाले आहेत.
बाजारातील मूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) अंतर्गत चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती लीक केल्याचं तपासात उघड झाले आहेत. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यावसायिक धोरणे आणि बाजारावर परिणाम करू शकणारी संवेदनशील माहिती बाहेरील व्यक्तींना दिल्याचे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, हे अधिकारी बँकेतील काही महत्त्वाच्या व्यवसायांची आणि कामाची जबाबदारी सांभाळतात.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती लीक होत असल्याचा संशय आल्यानंतर एचडीएफसी बँकेने अंतर्गत चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान दोन अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. बँकेकडून अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसंच या माहितीची गैरवापर केला होता का? याची माहिती घेतली जात आहे.
एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्याने अंतर्गत आढावा घेत असल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यांनी निष्कर्षांवर किंवा त्यात सामील अधिकाऱ्यांवर भाष्य केले नाही. "आमच्या धोरणांनुसार, सर्व संबंधित तथ्ये गोळा करण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी या प्रकरणाचे अंतर्गत पुनरावलोकन सध्या सुरू आहे," असे प्रवक्त्याने ईमेलद्वारे सांगितले आहे. "पुनरावलोकन पूर्ण झाल्यावर, निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल."
बँकेने म्हटले आहे की, ती नैतिकता आणि प्रशासनाचे सर्वोच्च मापदंड जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. तसेच संभाव्य उल्लंघनांच्या तक्रारी गांभीर्याने घेत असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष, बोर्डाच्या काही सदस्यांसह वरिष्ठ व्यवस्थापनाला या वर्षाच्या सुरुवातीलाच कळवण्यात आले होते, असे संबंधित व्यक्तींनी सांगितले. त्यानंतर, या निष्कर्षांबाबत दोन्ही अधिकाऱ्यांना अधिकृतपणे सूचित करण्यात आले आहे; मात्र त्यांच्यावर नेमकी काय शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान यामुळे अनुप बागची यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहणार असल्याचे दिसत आहे. आयसीआयसीआय (ICICI) समूहातील अनुभवी असलेले बागची, 27 ऑक्टोबर रोजी एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मार्च महिन्यात, तत्कालीन अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या वैयक्तिक मूल्यांमध्ये आणि बँकेतील काही कार्यपद्धतींमध्ये तफावत असल्याचे कारण दिले होते. बँकेने मात्र हे दावे फेटाळले होते.