पगार ₹25300 एकूण संपत्ती ₹65.72 कोटी... पोलीस दलातील ड्रायव्हरच्या घरी छापा; सापडलेल्या गोष्टी पाहून अधिकारी शॉकमध्ये
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हा कर्मचारी पोलीस दलात एक चालक म्हणून काम करतो. मागील बऱ्याच काळापासून तो ड्युटीवर आलेला नाही. असं असताना त्याच्या पगाराच्या तुलनेत त्याच्याकडे सापडलेली संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे पडलेत...
मध्य प्रदेश पोलीस दलातील एक चालक सध्या राज्यभरात चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा चालक त्यांच्या कर्तव्यावरील कामगिरीमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सामान्य हवालदार पदावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडील संपत्ती पाहून सरकारी अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे पडले. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारविरोधी लोकायुक्तांनी तपास सुरु केला असून समोर आलेली माहिती पाहून सगळेच हादरून गेलेत.
65.72 कोटी रुपयांची संपत्ती
हा सारा प्रकार इंदूरमधील असून येथील एका हेड कॉन्स्टेबलकडे 50 ठिकाणी बेनामी संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रॉपर्टी सदर हेड कॉन्स्टेबलबरोबरच त्याचे कुटुंबीय, सहकारी आणि त्यांच्याशीसंबंधित कंपन्यांच्या नावाने खरेदी करण्यात आल्या आहेत. या सर्व संपत्तीची किंमत 65.72 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती शुक्रवारी या प्रकरणाशीसंबंधित एका अधिकाऱ्याने दिली.
कोण आहे हा कर्मचारी?
या प्रकरणातील आरोपीचं नाव फिरोज खान असं आहे. इंदूरमधील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात चालक म्हणून फिरोज खान काम करतो. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर तो चौकशीच्या फेऱ्यात आला असून दाखल तक्रारीनुसार, तो दीर्घकाळापासून ड्युटीवर गैरहजर होता. आपल्या पदाचा गैरवापर करून त्याने ही एवढी वादग्रस्त मालमत्ता गोळा केल्याचं सांगितलं जात आहे.
भ्रष्टाचारविरोधी लोकायुक्तांनी पोलिसांच्या मदतीने 14 ऑक्टोबर रोजी खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले. त्यानंतर, भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारणा कायद्याअंतर्गत (प्रिव्हेंशन ऑफ करप्शन (अमेंडमेंट) ॲक्ट) कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात फिरोज खान आणि त्यांची जवळची सहकारी रोशनी वर्माविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील तालन यांनी दिली आहे.
50 ठिकाणी बेनामी संपत्ती
तपास हाती घेतल्यापासून आतापर्यंत 50 ठिकाणी फिरोज खानच्या नावावर स्थावर मालमत्ता सापडल्या आहेत. या सर्व मालमत्ता फिरोज खान, त्याचे नातेवाईक, सहकारी आणि त्यांच्याशी संबंधित खाजगी कंपन्यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं समोर आलाय. या संपत्तीमध्ये घरे, शेतजमीन, तसेच निवासी आणि व्यावसायिक भूखंडांचा समावेश आहे, असे तालन यांनी स्पष्ट केलं. सरकारी दरांनुसार या मालमत्तांचे एकूण मूल्य 18.29 कोटी रुपये आहे. मात्र, त्यांचे अंदाजे बाजारमूल्य 65.72 कोटी रुपयांच्या घरात आहे, असेही तपास अधिकाऱ्याने नमूद केले आहे. सध्या तपास सुरू असून, आतापर्यंत समोर आलेली आकडेवारी ही प्राथमिक निष्कर्षांवर आधारित आहे.
एफआयआर दाखल होणे किंवा मालमत्ता सापडणे म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असा होत नाही; तपासादरम्यान या आरोपांची सखोल छाननी केली जाईल. या मालमत्ता जप्त केल्या गेल्या आहेत का किंवा आणखी कोणाला अटक केली जाऊ शकते का, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, कथित 'अवैध मालमत्ते'बाबत म्हणजेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीसंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही.
आईच्या नावावरही घेतली संपत्ती
देवासमधील एका निवासी वसाहतीत असलेल्या दोन भुखंडांची किंमत 60.54 लाख इतकी असून हे दोन्ही भूखंड फिरोज खानच्या नावावर आहेत. याशिवाय, देवास जिल्ह्यातील पिपलरवान येथे फिरोज खानच्या आईच्या नावावर 6 लाख रुपयांना खरेदी केलेली लाकूड कापण्याची मशिनही सापडल्या आहेत. पोलीस दलातील आपल्या 24 वर्षांच्या कार्यकाळात खानने पगार म्हणून 75 लाख रुपये कमावले आहेत. त्याचे एकूण कायदेशीर उत्पन्न 1.94 कोटी रुपये इतके असल्याचे समोर आले आहे.
हेड कॉन्स्टेबलचा पगार किती असतो?
हेड कॉन्स्टेबलचा पगार संवर्ग, सेवेचा कालावधी, वेतन स्तर आणि लागू असलेल्या राज्यातील नियमांवर अवलंबून असतो. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या राज्यनिहाय वेतनश्रेणीनुसार, मध्य प्रदेशातील हेड कॉन्स्टेबलचा पगार अंदाजे 25300 रुपये ते 80500 रुपये आहे. मात्र वेतनवाढ आणि नियुक्तीच्या तपशिलानुसार प्रत्यक्ष मूळ पगारात बदल होतो. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यासारखे भत्ते एकूण पगारात भर घालू शकतात, तर कपातीमुळे हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होतो. तरी सर्वसाधारण सरासरी पगार हा 40 ते 50 हजारांदरम्यान असतो.