मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मोठ्या मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभा सदस्यत्वही सोडलं
डेअरी आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री राहिलेल्या भाजपा नेते एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री असलेल्या मुरुगन यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. दुग्ध मंत्रालयाचे कामकाज पाहणाऱ्या मुरुगन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतमाता आणि तामिळनाडूची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.
ते म्हणाले, "रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असण्यापासून ते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात सेवा करण्यापर्यंतचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. आता मला तळागाळात परतायचे आहे, माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहायचे आहे आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करायचे आहे. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर, स्वतः सर्वात शेवटी."
मुरुगन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात काय लिहिले?
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांना आपला पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अलीकडील दौऱ्याचाही उल्लेख केला आणि सांगितले की, लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले व त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
त्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या मनात नवी आशा निर्माण झाली आहे. त्यांचा उत्साह आणि पाठिंबा एका चांगल्या भविष्यावरील त्यांचा विश्वास दर्शवतो. याव्यतिरिक्त, मुरुगन यांनी लोकांच्या प्रेमाबद्दल आणि राज्याप्रती असलेल्या समर्पणाबद्दल आपली प्रेरणा, अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत म्हटले की, लोकांच्या प्रेमाने तामिळनाडू, पक्ष आणि देशासाठी अधिक काम करण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण हे आहे की, एल. मुरुगन यांना आता तामिळनाडूमध्ये भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे.
भाजप आखतीये मजबूत रणनिती
मुरुगन यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी तामिळनाडूमध्ये आपली पकड मजबूत करण्याकरिता भाजप एका रणनीतीवर गांभीर्याने काम करत असल्याचे मानले जात आहे. पक्ष मुरुगन यांना राज्य राजकारणात संघटनात्मक आणि राजकीय जबाबदाऱ्यांसह प्रमुख जबाबदाऱ्या देण्याची योजना आखत आहे. मुरुगन यांना तामिळनाडूमधील पक्षाचा प्रमुख दलित चेहरा मानले जाते.