महाराष्ट्रातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट; बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या 2027 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. HSC परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर SSC परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार. प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही जाणून घ्या.
महाराष्ट्रातील लाखो दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर येतेय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलंय. महाराष्ट्र बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. आता विषयवार वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या दिवशी आहे, याचे नियोजन करता येणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसह जनरल व बायफोकल अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाखेचे आणि विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उरलेल्या कालावधीचा अभ्यासाचे नियोजन, उजळणी आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उपयोग करता येणार आहे.
दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांसह विविध विषयांच्या पेपरच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेच्या सुरुवातीच्या तारखेकडे लक्ष न देता प्रत्येक विषयाचा पेपर नेमका कोणत्या दिवशी आहे आणि त्यानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे असे आवाहन करण्यात आलंय.
प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधी?
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाची तयारीही वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून संबंधित विषयांचे स्वतंत्र नियोजन कळवले जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.
महाराष्ट्रातील नऊ विभागीय मंडळांत परीक्षा
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना विषयवार वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी [mahahsscboard.in](https://mahahsscboard.in) या संकेतस्थळाला भेट देऊन बारावी किंवा दहावी परीक्षेची संबंधित पीडीएफ डाउनलोड करावी. तसेच सोशल मीडिया किंवा WhatsApp वर फिरणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलंय.