पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी अनेक जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. मागील काही काळापासून सुरु असलेल्या ईव्हीएमसंदर्भातील वादाला चोख प्रत्युत्तर देताना बॅलेट पेपरच्या माध्यमातून या झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपाने चमकदार कामगिरी करत विरोधकांची बोलती बंद केल्याची चर्चा भाजपा समर्थकांमध्ये आहे. मात्र असं असतानाच भाजपाची अवस्था 'गड आला पण सिंह गेला' अशी झाली आहे ती वाराणसी आणि नागपुरमधील निकालामुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नागपुरमध्ये काँग्रेसचा पदवीधर आमदार निवडून आला आहे. नेमके इथं काय निकाल लागलेत जाणून घेऊयात...
नागपुरमध्ये काँग्रेसचा पदवीधर आमदार
नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धक्का दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी 3 हजार 271 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. रात्री 1 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच तब्बल 41 तासांपेक्षा जास्त तास ही मतमोजणी चालली.
41 तास चाललेल्या मतमोजणीमध्ये काय झालं?
पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक 75 हजार 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार 32 मते अवैध ठरली. तर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67 हजार 231 मते घेत अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.
मोदींच्या मतदारसंघात समाजवादीचा विजय
दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर, उत्तर प्रदेशमधील मेरठ पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजपचा विजय झाला आहे. दिनेश कुमार गोयल आणि श्री चंद शर्मा विजयी झाले आहेत. याशिवाय, बरेली-मुरादाबाद शिक्षक आणि लखनौ शिक्षक मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ अशलेल्या वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले. वाराणसीमध्ये लाल बिहारी यादव यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांचा पराभव केला.
कर्नाटकमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी
कर्नाटकातील विधान परिषद निवडणुकीत मात्र भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसशासित या राज्यात भाजप-जेडीएस युतीने सर्व चारही जागा जिंकल्या आहेत. हा निकाल सत्ताधारी काँग्रेससाठी एक मोठा फटका मानला जात आहे. 2028 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि जेडीएस यांच्यातील समन्वयाचा विचार करता चार जागांवर मिळालेला हा विजय दक्षिणेत नव्या राजकीय बदलाची नांदी ठरु शकतो असं राजकीय जाणकार सांगतात.