SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गड आला पण सिंह गेला... मोदींच्या वाराणसीमध्ये समाजवादी पार्टीचा शिक्षक आमदार तर नागपुरमध्ये काँग्रेसचा विजय

महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक ठिकाणी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी रात्री उशीरा समोर आले. या निकालांमध्ये दोन निकाल सध्या चांगलेच चर्चेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर विरोधकांनी बाजी मारली आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 06:45 AM IST | Updated: Oct 29, 2026, 07:16 AM IST
Image Credit: मोदींच्या वारणसी मतदारसंघात आणि नागपुरमधील निकालाची चर्चा (प्रातिनिधिक फोटो)
Join

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी अनेक जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. मागील काही काळापासून सुरु असलेल्या ईव्हीएमसंदर्भातील वादाला चोख प्रत्युत्तर देताना बॅलेट पेपरच्या माध्यमातून या झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपाने चमकदार कामगिरी करत विरोधकांची बोलती बंद केल्याची चर्चा भाजपा समर्थकांमध्ये आहे. मात्र असं असतानाच भाजपाची अवस्था 'गड आला पण सिंह गेला' अशी झाली आहे ती वाराणसी आणि नागपुरमधील निकालामुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नागपुरमध्ये काँग्रेसचा पदवीधर आमदार निवडून आला आहे. नेमके इथं काय निकाल लागलेत जाणून घेऊयात...

नागपुरमध्ये काँग्रेसचा पदवीधर आमदार

नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धक्का दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी 3 हजार 271 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. रात्री 1 वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच तब्बल  41 तासांपेक्षा जास्त तास ही मतमोजणी चालली.

41 तास चाललेल्या मतमोजणीमध्ये काय झालं?

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक 75 हजार 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार 32 मते अवैध ठरली. तर  1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67 हजार 231 मते घेत अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.

मोदींच्या मतदारसंघात समाजवादीचा विजय

दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर, उत्तर प्रदेशमधील मेरठ पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजपचा विजय झाला आहे. दिनेश कुमार गोयल आणि श्री चंद शर्मा विजयी झाले आहेत. याशिवाय, बरेली-मुरादाबाद शिक्षक आणि लखनौ शिक्षक मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ अशलेल्या वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले. वाराणसीमध्ये लाल बिहारी यादव यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांचा पराभव केला.

कर्नाटकमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी

कर्नाटकातील विधान परिषद निवडणुकीत मात्र भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसशासित या राज्यात भाजप-जेडीएस युतीने सर्व चारही जागा जिंकल्या आहेत. हा निकाल सत्ताधारी काँग्रेससाठी एक मोठा फटका मानला जात आहे. 2028 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि जेडीएस यांच्यातील समन्वयाचा विचार करता चार जागांवर मिळालेला हा विजय दक्षिणेत नव्या राजकीय बदलाची नांदी ठरु शकतो असं राजकीय जाणकार सांगतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES