...तर ₹200 ऐवजी ₹1000 टोल भरावा लागणार! सरकारचा नवा नियम; टोलनाक्यावरील 'ही' चूक फारच महागात पडेल
टोल वसुलीसंदर्भातील अत्यंत आधुनिक पद्धत अनेक ठिकाणी कार्यान्वयित करण्यात आली असून या नव्या पद्धतीनुसार टोल नाक्यावरील एक चूक वाहनचालकांना फार महागात पडू शकते. नेमका हा नवा नियम काय आहे जाणून घ्या...
टोलनाके आणि टोलची रक्कम हा महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन नियम केला असून टोलनाक्यावरील एक चूक वाहनचालकांना चांगलीच महागात पडू शकते. ही चूक केली तर वाहनचालकांकडून सामान्य टोल शुल्काच्या पाचपट अधिक दंड आकारला जाणार असल्याचं मंत्रालयाच्या नव्या नियमामध्ये म्हटलं आहे. म्हणजेच जर टोल 200 रुपये असेल तर त्याऐवजी एक हजार रुपये भरावे लागतील असा हा नियम आहे. नेमका नियम काय आणि कोणत्या परिस्थितीत हा दंड होऊ शकतो जाणून घेऊयात...
कोणत्या वाहनचालकांना बसणार फटका?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बॅरियर-फ्री किंवा मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली म्हणजेच 'एमएलएफएफ'अंतर्गत हा नवा नियम केला आहे. नव्या नियमानुसार टोल चुकवण्याचा प्रयत्न केल्यास पाचपट टोल आकारला जाणार आहे. अनेकजण टोल प्लाझावर जाणूनबुजून वाहनाची नंबर प्लेट झाकून, लपवून, त्यात छेडछाड (फेरफार) करून टोलची रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करतात अशा वाहनचलाकांना याचा फटका बसणार आहे.
टोल शुल्क चुकवण्यासाठी इतरही अनेक मार्गांचा अवलंब करणारे अनेकजण आहेत. मात्र यापुढे वाहनचालक असं काही करताना आढळल्यास मूळ टोल रकमेच्या पाचपट दंड भरावा लागणार आहे. ज्या वाहनांवर वैध फास्टॅग लावलेला नसेल आणि टोल चुकवण्याचा प्रयत्न होईल, अशा वाहनचालकांवरही या नियमांतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
ही नवीन प्रणाली आहे तरी काय?
मल्टी-लेन फ्री फ्लो (एमएलएफएफ) ही अडथळामुक्त म्हणजेच बॅरियर-फ्री टोल वसुलीची आधुनिक प्रणाली आहे. यामध्ये वाहनांना टोलनाक्यावर न थांबता प्रवास करता येतो आणि उच्च क्षमतेचे कॅमेरे व सेन्सर्सच्या मदतीने वाहनाचा नंबर आणि फास्टॅग स्कॅन करून आपोआप टोल कापला जातो. या प्रणालीमुळे वाहनांना काही सेकंदही टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही, हे विशेष!
कुठे कुठे वापरलं जाणार हे तंत्रज्ञान?
ज्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि टोल प्लाझांवर एमएलएफएफ प्रणाली आधीच कार्यान्वित झाली आहे तिथे हा नियम लागू करण्यात आला आहे. तसेच, भविष्यात ज्या टोलनाक्यांवर ही नवीन प्रणाली सुरू होईल, तिथेही हाच नियम लागू केला जाणार आहे.
डायरेक्ट चलान येणार?
या नव्या नियमामुळे टोल वाचवण्याच्या नादात गैरप्रकार करणाऱ्यांना पाचपट टोल भरावा लागण्याची शक्यता अधिक आहे. तसेची ही दंड वसुली थेट तांत्रिक माध्यमातून करण्याचा विचार सुरु असल्याने थेट चलान कापलं जाईल. त्यामुळे मानवी हस्तक्षेप नसल्याने हा दंड भरण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध नसेल, असं सांगितलं जात आहे.