भारतातलं सगळ्यात छोटं गाव... इथं किती लोक राहतात? ते काय काम करतात? हे गाव आहे तरी कुठं?
तुम्ही देशातील सर्वात छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या गावाबद्दल कधी ऐकलं आहे का? या गावामध्ये कोण राहतं? हे गाव आहे कुठं? इथं राहणारे लोक काय काम करतात? जाणून घ्या सविस्तर माहिती...
भारतात वेगवेगळी वैशिष्ट्यं असलेली अनेक गावं आहेत. शनिशिंगणापूरसारखं गाव घरांना दारं नसल्याने प्रसिद्ध आहे. तर कोकणातली अनेक गावं ही निसर्गरम्य परिसर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील वेगवगेळ्या भागांमधील वेगवेगळी गावं अनोख्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका अनोख्या गावाबद्दल जाणून घेणार आहोत तिथे केवळ एकच घर असून या एका घरातून गावचा संपूर्ण कारभार चालतो. हे गाव येथील लोकसंख्येमुळेही अनोख्या गावांच्या यादीत आहे. हे गाव नेमकं आहे कुठे तिथं कोण राहतं आणि काय आहे त्याची गोष्ट जाणून घेऊयात...
गावात 300 वर्षांपूर्वीच एकच घर
संपूर्ण गावाचा कारभार हा एकाच घरातून चालतोय असं सांगितलं तर तुम्ही म्हणाल असं कसं? तर यामागील कारण आहे या गावात एकच घर आहे. य घरामध्ये सहाजण राहतात. हे गाव आपल्या अत्यंत कमी लोकसंख्येमुळे चर्चेत असतं. या गावात माती व दगडांपासून बनवलेलं एकच घर असून याच घरात संपूर्ण गाव म्हणजे इथले सहाजण राहतात. हे एकमेव घर 300 वर्षांहून अधिक जुनं आहे. हे घर केवळ दगड आणि मातीपासून बनवण्यात आलेलं आहे. याच जुन्या घरात सध्या एकाच कुटुंबातील पाचवी पिढी वास्तव्यास आहे.
या गावाचं नाव काय? हे गाव आहे कुठे?
आपण ज्या गावाबद्दल बोलतोय ते गाव हिमाचल प्रदेशमध्ये आहे. येथील निसर्गरम्य स्पीति खोऱ्यात उंचावर वसलेले आहे. या गावाचं नाव 'काकती' असं आहे. स्पीतिमधील काजा येथून हे गाव 10 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरात वसलेलं आहे.
इथं राहाणारे लोक नेमकं करतात काय?
काकाती गावात राहणाऱ्या या एकमेव कुटुंबातील मोठा भाऊ हा पत्नी आणि मुलांसोबत येथे राहून शेती करतात. कुटुंबातील परंपरेनुसार लहान भाऊ कलझंग टाकपा लामा बनले असून ते काझा येथील बौद्ध गोम्पा (मठ) मध्ये सेवा देतात. या गावामध्येच काय तर गावाच्या आजूबाजूला अनेक किलोमीटरपर्यंत लोकवस्ती नाही. शेती आणि त्यातही प्रामुख्याने बटाटे हे इथलं मुख्य पिक असून पशुपालन हा जोडधंदा आहे. अलीकडेच येथे फोर-जी नेटवर्क पोहोचले आहे. या गावाची सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद असून ते 'एक कुटुंबाचे गाव' म्हणून ओळखलं जातं.
याच नावाच्या गावाशी मराठ्यांशीही संबंध
विशेष म्हणजेच याच काकाती नावाने अजून एक छोटसं गाव भारतात असून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या बेळगावमध्ये आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर काकाती गाव आहे. येथे काकती किल्ला आहे. या गावाला ऐतिहासिक महत्त्व असून इथं कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा जन्म झाला होतं. 23 ऑक्टोबर 1778 रोजी चेन्नम्मा यांचा काकातीमध्ये जन्म झालेला. या गावाचा संबंध मराठा साम्राज्याशी आहे. या किल्ल्यावर पेशव्यांचं नियंत्रण होतं अशा नोंदी सापडतात.