उन्हाळा, पावसाळा आणि आता हिवाळा उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. काहीच दिवसांत दिवाळी सुरू होईल. पण दिवाळीला अगदी काही दिवस बाकी आहेत. मात्र अजूनही थंडीची चाहुल काही लागली नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं देशातील काही भागात पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, भारतीय हवामान विभागाने थंडीबाबतही अंदाज वर्तवला आहे.
शनिवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नोव्हेंबर महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात मध्य आणि पूर्व भारताचा भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह लगतच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात थंडी तुलनेने कमी राहण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहणार असले तरी मराठवाड्यात सरासरी किमान तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. तर देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीर आणि मध्य भारताचा भाग, तसेच पूर्वोत्तर राज्ये वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती नोव्हेंबर महिन्यात अतितीव्र होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा खूप कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि लगतच्या राज्यात सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची शक्यता आहे.
मुंबईत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला उकाडा कायम राहणार आहे. समुद्राच्या प्रभावामुळं शहरातील किमान तापमानातही लगेच मोठी घट होत नाही. त्यामुळं दिवाळीनंतर लगेच गुलाबी थंडीचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हिवाळ्यासारखा गारवा जाणवण्यासाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळं मुंबईकरांना खऱ्या अर्थाने थंडीचा अनुभव डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.