मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला की तो कोणाचा असेल, याचा अंदाज बांधावा लागतो. अनेक जण यासाठी ट्रूकॉलरसारख्या अॅपचा वापर करतात. मात्र, आता अशा अॅपशिवायही कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) 1 नोव्हेंबर 2026 पासून कॉलिंग नेम प्रेसेंटेशन म्हणजेच CNAP सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे कॉल करणाऱ्याचा नंबर आणि त्याच्या टेलिकॉम कंपनीकडे नोंद असलेले नाव दिसेल. विशेष म्हणजे, ग्राहकांना यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
CNAP म्हणजे कॉलिंग नेम प्रेसेंटेशन सध्या फोन आल्यावर स्क्रीनवर मुख्यतः नंबर दिसतो. नव्या सुविधेत त्या नंबरसोबत कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नावही दिसेल. हे नाव संबंधित टेलिकॉम ऑपरेटरच्या ग्राहक नोंदणी आणि KYC डेटाबेसमधून घेतले जाणार आहे.
या सेवेसाठी वेगळे अॅप डाउनलोड करण्याची किंवा पैसे भरण्याची आवश्यकता नाही. टेलिकॉम कंपन्यांना ही सुविधा ग्राहकांसाठी आपोआप उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच एअरटेल, जियो, वोडाफोन, आयडीया यांसारख्या कंपन्यांच्या पात्र नेटवर्कवरील ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
सुरुवातीला ही सुविधा 4G आणि त्यापुढील तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल नेटवर्कसाठी लागू आहे. 2G, 3G आणि लँडलाइन सेवांसाठी CNAP लागू करण्याचा निर्णय नंतर स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलवर आजपासूनच नाव दिसेल, असे समजू नये, असा सल्ला यूजर्सना देण्यात आलाय.
एखाद्याचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही सेव्ह केलेले नावच दिसेल. नंबर सेव्ह नसेल, तर टेलिकॉम कंपनीच्या नोंदीतील नाव स्क्रीनवर येईल. परदेशातून कॉल आल्यास आंतरराष्ट्रीय कॉल असा उल्लेख दिसेल. कॉलरने नंबर लपवण्याची CLIR सुविधा घेतली असल्यास त्याचे नाव दाखवले जाणार नाही.
CNAP मुळे अनोळखी कॉल ओळखणे सोपे होऊ शकते. मात्र स्क्रीनवर दिसणारे नाव म्हणजे कॉल करणारी व्यक्ती विश्वासार्ह आहे, याची हमी नाही. अनेकदा केवायसी नोंदीतील नाव जुने किंवा चुकीचे असण्याची शक्यता असते. त्यामुळे बँक, सरकारी अधिकारी किंवा कुरिअर कर्मचारी असल्याचे सांगून ओटीपी, पिन किंवा बँक तपशील मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.