आमदार-खासदारांना पक्षांतर करून राजीनामा देणं महागात पडणार? पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात काय घडलं?
पक्षांतरबंदी कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली. राजीनामा आणि अपात्रतेबाबत याचिकेत नेमक्या काय मागण्या? जाणून घेऊया.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत आमदारांचे पक्षांतर, राजीनामे आणि अपात्रतेच्या याचिकांवरून मोठे राजकीय वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा हा विषय महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. यासंदर्भातील मोठी अपडेट समोर येतेय. आमदार किंवा खासदाराने पक्षांतराच्या आरोपांनंतर राजीनामा दिला, तर त्याच्याविरोधातील अपात्रतेची प्रक्रिया थांबवता येऊ नये, अशी महत्त्वाची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पक्षांतर आणि राजीनाम्यांच्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. काय घडलंय नेमकं? भविष्यात याचा काय बदल दिसू शकतो? सविस्तर जाणून घेऊया.
पक्षांतरबंदी कायद्यात बदल करण्याची मागणी
ए. सेथू यांनी सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी बाजू मांडली. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अपात्रतेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर?
याचिकेतील प्रमुख मुद्दा म्हणजे अपात्रतेची कारवाई सुरू होण्याची शक्यता असताना काही लोकप्रतिनिधी राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अशा राजीनाम्यांमुळे सभागृहातील पक्षीय संख्याबळ बदलू शकते आणि सरकारच्या स्थैर्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राजीनामा दिला म्हणून अपात्रतेची याचिका आपोआप निकाली निघू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजीनामा स्वेच्छेने दिला की राजकीय फायद्यासाठी?
राजीनामा खरोखर स्वेच्छेने दिला आहे की त्यामागे राजकीय दबाव किंवा अन्य हेतू आहे, याची वस्तुनिष्ठ तपासणी व्हावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींनी राजीनाम्याच्या वैधतेबरोबरच प्रलंबित अपात्रता याचिकेवरही स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा. या दोन्ही प्रक्रियांमध्ये निश्चित कालमर्यादा, पारदर्शकता आणि कारणांसह आदेश देण्याची व्यवस्था असावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
त्रिशंकू विधानसभेत बहुमत चाचणीबाबतही मुद्दा
त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात असताना सरकार स्थापनेचा दावा केवळ समर्थनपत्रे किंवा सभागृहाबाहेरील शक्तिप्रदर्शनाच्या आधारे मान्य करू नये, असे याचिकेत म्हटले आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर विधिवत स्थापन झालेल्या सभागृहातच बहुमत चाचणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी संविधानातील अनुच्छेद 188 चा संदर्भ देण्यात आलाय. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सध्या संबंधित यंत्रणांकडून उत्तर मागवले आहे. याचिकेतील मागण्या मान्य झालेल्या नाहीत किंवा कायद्यात तातडीने बदल झालेला नाही. केंद्र सरकार आणि इतर संस्थांची भूमिका समोर आल्यानंतर या प्रकरणातील पुढील दिशा स्पष्ट होऊ शकणार आहे.