गुरुनानक जयंतीनिमित्त 24 नोव्हेंबर 2026 रोजी म्हणजेच मंगळवारी देशातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे नव्हे तर नागपूर आणि नवी मुंबईतील बेलापूरसह अनेक शहरांमधील बँकांचे व्यवहारही बंद राहणार आहेत. असे असले तरी शाळांची सुट्टी आणि बँकांची सुट्टी यांची यादी वेगळी आहे. त्यामुळे पालक आणि बँकेच्या ग्राहकांनी काय लक्षात ठेवायचं? सविस्तर जाणून घेऊया.
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रकाशपर्व साजरे केले जाते. यंदा गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर, मंगळवारी आहे. पंजाब सरकारच्या 2026 च्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये या दिवसाचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनानेही 2026 च्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत गुरुनानक जयंतीचा समावेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान,
छत्तीसगड, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 24 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी असण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये गुरुनानक जयंती, तर काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना एकसारखा आदेश लागू असेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे अधिकृत परिपत्रक तपासावे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सार्वजनिक सुट्ट्यांच्या 2026 च्या यादीत 24 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी नमूद आहे. त्यामुळे राज्य सरकारी कार्यालयांसाठी हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित शिक्षण संस्था किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचना जाहीर करतील, याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेकडून आलेला मेसेज तपासावा लागणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नोव्हेंबर 2026 च्या अधिकृत सुट्टीच्या यादीनुसार, 24 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी आहे. यामध्ये मुंबई, बेलापूर, नागपूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, रायपूर आणि रांची या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या शहरांतील बँकांच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार होणार नाहीत.
बँकांना सुट्टी असली तरी इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सुविधा सामान्यतः सुरू राहतात. मात्र, धनादेश वटवणे, शाखेत जाऊन पैसे जमा करणे किंवा इतर प्रत्यक्ष कामांसाठी ग्राहकांना पुढील कामकाजाच्या दिवसाची वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे महत्त्वाचे बँक व्यवहार असल्यास ते आधीच पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आलंय. शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्टीबाबतही अंतिम निर्णयासाठी संबंधित संस्थेची अधिकृत सूचना तपासण्याचे आवाहन करण्यात आलंय.