दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी युट्युबर ध्रुव राठी याच्याविरुद्ध 2018 च्या मानहानी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे. राठीच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओवरून विकास संक्रित्यायन (उर्फ विकास पांडे) यांनी दाखल केलेल्या खटल्यात, न्यायिक दंडाधिकारी अनम रईस खान यांनी हे वॉरंट काढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार असून, सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे. याआधी 31 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने राठीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
17 ऑक्टोबर रोजी, नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला राठीचे घर बंद आढळल्यानंतर, न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले होते. तसेच, न्यायालयाने हरियाणातील गुरुग्राम येथील त्याच्या पत्त्यावर पुन्हा समन्सही पाठवले होते.
राठीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तो सहसा ऑस्ट्रियामध्ये राहतो आणि दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या निदर्शनांसाठी भारतात आला होता. न्यायालयाने नोंदवले की, राठीला सर्वप्रथम जुलै 2019 मध्ये समन्स बजावण्यात आले होते. हे प्रकरण 2018 मध्ये विकास पांडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीशी संबंधित आहे, जी राठीने आपल्या युट्युब चॅनेलवर त्यांच्याविरुद्ध एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दाखल करण्यात आली होती.
2018 मधील मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील कोर्टाने ध्रुव राठी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. विकास संक्रित्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
मे 2018 मध्ये ध्रुव राठी यांनी 'BJP IT Cell Part II' या हेडिंगने व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. भाजपच्या आयटी सेलने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत विकास पांडे यांनी ध्रुव राठी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे या प्रकरणात केजरीवाल यांच्याविरोधातही मानहानीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने ध्रुव राठी यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, समन्स बजावण्यात अडचणी येत असल्याने आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग अनम रईस खान यांनी हा आदेश दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याने ध्रुव राठी यांच्या अडचणी वाढल्या असून, आता पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.