IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना हा ड्रॉ झाला. सामन्याच्या पाचव्या दिवसानंतर शुभमन गिल हा पत्रकार परिषदेत पोहोचला. या पत्रकार परिषदेत त्याने सामना ड्रॉ झाल्यावर पाचव्या दिवशी बेसिन रिजर्वची पीच गोलंदाजांना मदत नाही करू शकली यावर निराशा व्यक्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचा मोठा नियम बदलण्याची मागणी केली. शुभमन गिलने गोलंदाजांना बॉल चमकवण्यासाठी पुन्हा एकदा लाळ वापरण्याची परवानगी मागितली आहे.
काय म्हणाला शुभमन गिल?
न्यूझीलंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना संपल्यानंतर गिलने पत्रकारांना सांगितले की, 'आपण कोविड काळापासून खूप पुढे निघून गेलो आहे. तेव्हा एक नियम होता की बॉल चमकवण्यासाठी लाळ वापरली जात नव्हती. आता सात ते आठ वर्ष झाली आहेत. मला नाही माहित आता याची परवानगी पुन्हा का दिली जात नाही. मला वाटते की, आम्ही वापरलेला पहिला बॉल सुमारे 25-30 ओव्हरनंतर खूप मऊ झाला होता. मला वाटते की न्यूझीलंडने याबद्दल तक्रार केली होती; आम्ही इंग्लंडमध्येही अशीच गोष्ट अनुभवली होती'.
खेळपट्टीवरून गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती, ज्यामुळे पहिल्या डावात 352 धावांनी पिछाडीवर असूनही न्यूझीलंड सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. कुकाबुरा बॉलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय कर्णधाराने असे नमूद केले की, बॉल मऊ असेल तर तो बॅटेच्या कडेला लागून विकेटकिपरपर्यंत किंवा स्लिपमधील फिल्डरपर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी असते.
शुभमन गिल म्हणाला की, 'मला नाही माहित की बॉलच्या गुणवत्तेत काही कमतरता राहिलीये किंवा दुसरं काही झालंय. पण जर अशा परिस्थितीत जर विकेटमधून काही मदत मिळत नसेल आणि बॉल नरम पडला तर विकेट घेणं खूप कठीण होऊन जातं'.
शुभमन गिलने नमूद केलं की, 'अशा प्रकारच्या चेंडूवर चेंडू बॅटच्या कडेला लागण्याची शक्यता खूप कमी असते. परिणामी विकेटकिपरकडे बॉलदेऊन बाद होण्याची शक्यताही कमी होते. शिवाय जर पिचवरून कोणतीही मदत मिळत नसेल, तर फलंदाजाला LBW बाद करणेही सोपे नसते'.