शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!
हरियाणातील पंचकुला शाळेत तिसरीतील विद्यार्थ्याने सहा वर्षांच्या मुलीवर दगड आणि फुलांच्या कुंडीने हल्ला केल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे. याप्रकरणी बालहक्क आयोग आणि शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू आहे.
शाळा म्हणजे मुलांसाठी सुरक्षित जागा असावी, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. मात्र हरियाणातील पंचकुला येथे घडलेल्या घटनेने या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बालवर्गातील सहा वर्षांच्या मुलीवर दगड आणि फुलांची कुंडी फेकून हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून बालहक्क आयोगानेही दखल घेतली आहे.
शाळेत नेमके काय घडले?
ही घटना 28 ऑक्टोबर रोजी पंचकुलातील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये घडली. तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बालवर्गातील सहा वर्षांच्या मुलीला वर्गात नेऊन तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
CCTV फुटेजमध्ये हल्ल्याचे दृश्य
समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये धक्कादायक कृत्य दिसतंय. मुलाने मुलीला वर्गात ओढून नेले. तिचे डोके बाकावर आपटले, तिला खाली पाडले आणि लाथा मारल्याचे दृश्य दिसते. त्यानंतर दगड आणि फुलांच्या कुंडीनेही मारहाण केल्याचे वृत्त आहे. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतरही हल्ला सुरू राहिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.
मुलीची प्रकृती कशी आहे?
जखमी मुलीला प्रथम पंचकुलातील सेक्टर 6 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला चंदीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात हलवण्यात आले. हरियाणा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी रुग्णालयात भेट दिली. मुलीच्या जीवाला सध्या धोका नसला तरी चेहऱ्याला आणि नाकाला फ्रॅक्चर झाले असून उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हल्ल्यामागचे कारण काय?
मुलीने शिक्षकांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे मुलाने हल्ला केल्याचा दावा तिच्या काकांनी केला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या आक्रमक वर्तनाबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र, हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, असे असले तरी मुलीच्या घरच्यांवर याचा जबर मानसिक आघात झाला आहे.
शाळेच्या सुरक्षेवर प्रश्न
घटना घडली तेव्हा सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि शिक्षकांची देखरेख पुरेशी होती का?, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केलाय. हरियाणाचे शिक्षणमंत्री महिपाल धांडा यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. बालहक्क आयोगानेही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून CCTV फुटेज, शिक्षकांची ड्युटी, उपस्थिती आणि घटनेनंतर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. चौकशीतून शाळेच्या देखरेखीतील त्रुटी स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.