मुंबईत नियमित नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आयटी, कॉम्प्युटर तसेच डेटा व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने मुंबईतील कार्यालयासाठी सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, असिस्टंट आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांवर थेट भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांचा तपशील, अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
IBPS च्या जाहिरात क्रमांक IBPS/2026-27/06 अंतर्गत तीन पदांचा समावेश आहे.सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर – ग्रेड D,असिस्टंट – ग्रेड B आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – ग्रेड B ही पदे भरली जाणार आहेत.ही नियमित स्वरूपातील थेट भरती आहे. मात्र, जाहिरातीत पदांची एकूण निश्चित संख्या नमूद केलेली नाही. निवड झालेल्यांची नियुक्ती उपलब्ध रिक्त पदांनुसार केली जाणार आहे.
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमधील बीई किंवा बीटेक पदवी आणि किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. लिनक्स सर्व्हर प्रशासन आणि नेटवर्क मॅनेजमेंटचे ज्ञान अपेक्षित आहे. यासाठी उमेदवाराचे वय 25 ते 33 वर्षांदरम्यान असावे.
असिस्टंटया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी आणि एमएस एक्सेलचे प्रगत ज्ञान आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव हवा. तसेच वय 23 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीएससी आयटी, बीसीए, बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स/आयटीमधील इंजिनिअरिंग पदवी आवश्यक. दोन वर्षांचा अनुभव आणि युनिक्स/लिनक्सचे ज्ञान हवे. वय 23 ते 30 वर्षांदरम्यान असावे.वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 रोजी मोजली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
या भरतीतील वेतनाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत. सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर : वार्षिक CTC अंदाजे ₹14.9 लाख, असिस्टंट पदासाठी वार्षिक सीटीसी अंदाजे ₹10.57 लाख, प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी वार्षिक CTC अंदाजे ₹10.57 लाख इतका पगार दिला जाणार आहे. सीटीसीमध्ये विविध भत्ते आणि कर्मचारी लाभांचा समावेश आहे.
उमेदवारांची निवड अर्जांची छाननी, कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होणार आहे. परीक्षा 100 गुणांची असून कालावधी 90 मिनिटे आहे. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची कपात होईल. मुंबईत राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झाल्यानंतर एक वर्षाचा प्रोबेशन कालावधी आणि दोन वर्षांची सेवा देण्याचा ₹1 लाखांचा बाँड लागू असेल. IBPS कडून निवासाची सुविधा मिळणार नाही.
इच्छुक उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला https://www.ibps.in भेट देऊन करियर्स विभागातील संबंधित भरतीची जाहिरात पाहावी. ऑनलाइन नोंदणी 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज शुल्क ₹250 आहे. फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, बायोडेटा आणि शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2026 असून यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.