₹160 कोटींचं 121 किलो सोनं दान... दाक्षिणात्य मंदिरात एकाच वेळी एवढं सोनं दान करणारा उद्योजक आहे तरी कोण?
विशेष म्हणजे हे सोनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. एवढं सोनं देणारा उद्योजक आहे तरी कोण? तो करतो काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
दक्षिण भारतामधील सर्वात प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजी (भगवान व्यंकटेश्वर स्वामी) मंदिराच्या इतिहासातील सर्वात मोठी देणगी आज देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एका निनावी भक्ताने तब्बल 121 किलो सोन्याचे दागिने दान केले असून या दागिन्यांची किंमत 150 ते 160 कोटी रुपये इतकी होते. मंदिराच्या इतिहासामधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक देणगी असल्याचं सांगितलं जात आहे.
का दिलं हे दान?
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय व्यावसायिकाने आपली कंपनी विकल्यानंतर मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दान केले आहे. मात्र, या भक्ताने आपले नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.
15 महिने खर्च करुन बनवले खास दागिने
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) प्रशासनाच्या सल्ल्यानुसार तब्बल सव्वा वर्ष म्हणजेच 15 महिने मेहनत घेऊन 45 विशेष दागिने घडवण्यात आले आहेत. नऊ संचांमध्ये विभागलेल्या या दागिन्यांमध्ये मुकुट, सुवर्ण पादुका, शंखचक्र, कमरपट्टा आणि अभय हस्त यांचा समावेश आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दागिने अधिकृतपणे मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा झाला?
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिरुपती एसव्ही ॲग्रिकल्चरल कॉलेज हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर त्यांचे तिरुमला येथील गायत्री निलयम येथे आगमन झाले. सकाळी 10 वाजता चंद्राबाबू नायडू यांनी वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्समधून श्रीवारी दर्शन घेतलं. सकाळी 11.35 वाजता हे 121 किलो सोन्याची देणगी औपचारिकरित्या मंदिर प्रशासनाकडे सोपवण्यात आली.
सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक
तिरुमला तिरुपती देवस्थानम हे जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक संस्थांपैकी एक असून, देवस्थानची एकूण मालमत्ता 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. देवस्थानकडे 11 टनांपेक्षा जास्त सोने, सुमारे 16000 कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि देशभरात 960 स्थावर मालमत्ता आहेत.
देवस्थानाकडे सोनं किती?
देवस्थानकडे विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 'गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम' अंतर्गत सुमारे 11329 किलो) शुद्ध सोने जमा आहे. याशिवाय, भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या नित्य पूजेसाठी आणि उत्सवांसाठी वापरले जाणारे सुमारे 2.5 टन मौल्यवान सुवर्ण अलंकार मंदिराच्या खजिन्यात आहेत. या सोन्याच्या ठेवींमधून देवस्थानला दरवर्षी व्याजाच्या रूपात शेकडो किलो सोने मिळते.
हा दानशूर उद्योगपती कोण?
'ॲक्सेस हेल्थकेअर' आणि 'आशिया चेन्नई इंजिनिअरिंग' चे संस्थापक वर्धमान जैन यांनीच तिरुमला तिरुपती देवस्थानमला 121 किलो सोन्याचे दागिने दान केल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये त्यांनी 'ॲक्सेस हेल्थकेअर'मधील 70% हिस्सा अमेरिकेतील एका कंपनीला विकला होता; हा व्यवहार सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा होता. याआधी, मे 2026 मध्ये वर्धमान जैन यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला इलेक्ट्रिक बसेसही दान केल्या होत्या. त्यांनी 'श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनेल'च्या विकासासाठी 7 कोटी रुपयांची देणगी दिलेली. तिरुमला तिरुपती देवस्थानमला 1 कोटी रुपये किमतीचे नाणी मोजण्याचे यंत्र (कॉइन-सॉर्टिंग मशिन) ही त्यांनी दिली आहे. वर्धमान जैन यांनी 'आविष्कार' नावाची एक संस्था सुरू केली आहे. ही संस्था वंचित तरुणांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. ते 'कांची कामकोटी चाइल्ड्स ट्रस्ट हॉस्पिटल'चे व्यवस्थापकीय विश्वस्त (मॅनेजिंग ट्रस्टी) देखील आहेत. 'सरिता जैन फाउंडेशन'च्या माध्यमातून ते 'विद्या सेवा' आणि 'वैद्य सेवा' या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांना पाठिंबा देतात.