महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?
तिने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन एक साडी मागवली आणि मात्र प्रत्यक्षात साडी पाहिल्यावर ती न आवडल्याने रिटर्न पॉलिसीनुसार परत करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्यानंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...
उत्तर प्रदेशमध्ये एका विचित्र घटनेमध्ये ऑनलाइन मागवलेल्या साडीच्या माध्यमातून महिलेची जवळपास एक लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार इटावा येथे राहणाऱ्या महिलेसोबत तिने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन केलेल्या खरेदीनंतर पसंत न पडलेली साडी परत करताना ही फसवणूक झाली. या फसवणुकीमध्ये महिलेला 99 हजार 518 रुपयांचा फटका बसला असून हे सर्व पैसे तिने गमावले आहेत.
नक्की झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इटावा जिल्ह्यातील बसैयाहार गावच्या रहिवासी असलेल्या आकांक्षाने 'फ्लिपकार्ट'वरून 674 रुपयांना एक साडी खरेदी केली होती. ऑनलाइन आवडलेली मात्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर तिला ती साडी आवडली नाही, म्हणून तिने ती साडी रिटर्न पॉलिसीअंतर्गत परत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिला गंडवण्यात आलं. तिच्या मोबाईलशी संलग्न बँक खात्यात असलेली आणि तिने कष्टाने वाचवलेली सर्व रक्कम काही क्षणांमध्ये लुटली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, साडी परत केल्यानंतर आकांक्षाने परताव्यासाठी (रिफंड) रिक्वेस्ट केली आणि सात दिवसांमध्ये पैसे परत मिळतील याची वाट पाहिली. मात्र सात दिवसांनंतरही जेव्हा तिच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तेव्हा तिने ऑर्डरशी संबंधित एका ग्राहक सेवा क्रमांकावर फोन केला.
स्क्रीन शेअर करायला सांगितलं
ज्या व्यक्तीला फोन केलेला त्या व्यक्तीने आकांक्षाला तिच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करायला सांगितली. तिला मिळालेले एक 'गिफ्ट कार्ड' उघडण्यास सांगितले. स्क्रीन शेअर करायला लावून आणि गिफ्ट कार्ड उघडायला सांगून, त्या भामट्याने आकांक्षाच्या फोनचा ताबा मिळवला. त्यानंतर, पाच वेगवेगळ्या व्यवहारांतून त्याने तिच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले. पहिल्या दोन व्यवहारांत प्रत्येकी 10 हजार रुपये काढले गेले. तिसऱ्या व्यवहारात 19999 रुपये काढले गेले. यानंतर, फसवणूक करणाऱ्याने आणखी 55 हजार रुपये काढून घेतले. शेवटच्या व्यवहारात 4495 रुपये तिच्या खात्यातून काढून घेण्यात आले.
खात्यावर एकही पैसा नाही
आकांक्षाचं या व्यक्तीशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान बोलणे झाले होते. संध्याकाळी जेव्हा तिने आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासली, तेव्हा तिला समजले की खात्यात एकही रुपया उरलेला नाही. तिने तातडीने याबद्दल आपल्या वडिलांना सांगितले. ते बँकेत पोहोचले, परंतु तोपर्यंत बँकेची शाखा बंद झाली होती. खात्यातील ही रक्कम कुटुंबाने आकांक्षाच्या लग्नासाठी आणि घरात पाण्याचा पंप बसवण्यासाठी साठवून ठेवली होती. आता हे कुटुंब आपल्या आयुष्यभराची बचत परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या कुटुंबाकडून केली जात आहे.
पोलिसांनी तपास का सुरु केला नाही?
या कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असं या प्रकरणी लावेदी पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव कुमार यांनी सांगितलं. कुटुंबाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, सायबर गुन्ह्यांशी संबंधित तरतुदींनुसार या प्रकरणाचा तपास केला जाईल, असंही कुमार यांनी स्पष्ट केले.