विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवणाऱ्या शिक्षकाला घडली जन्माची अद्दल, व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील एक शिक्षक एका मुलाच्या डोक्यावर तबल्याप्रमाणे थाप मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. वर्गात एका मुलाच्या डोक्यावर 'तबला वाजवल्यासारखे' कृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिनेश कुमार माथूर असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांनीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये माथूर खुर्चीवर बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या समोर जमिनीवर एक मुलगा बसलेला आहे.
माथूर यांनी त्या मुलाच्या डोक्यावर एखाद्या वाद्यावर थाप मारल्याप्रमाणे वारंवार हात मारला. यावेळी ते मोठ्याने हसत होते आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेली इतर मुलेही त्यात सामील झाली होती.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो 'बेसिक एज्युकेशन डिपार्टमेंट'च्या (मूलभूत शिक्षण विभाग) निदर्शनास आला. या घटनेची दखल घेत, (BSA) शिक्षण अधिकारी डॉ. राजेश कुमार यांनी दिनेश कुमार माथूर यांच्या वर्तणुकीला शिस्तभंगाची कृती मानून त्यांना त्वरित प्रभावाने निलंबित केले.विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून, चौकशीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.