एक मेसेज आणि तुमचा फोन ठप्प; काय आहे एसएमएस ऑफ डेथ? ज्यामुळे मोबाईल यूजर्सना भरलीय धडकी!
अँड्रॉइड फोनवर एसएमएस ऑफ डेथ सुरक्षा त्रुटीचा धोका समोर आलाय. अदृश्य एसएमएसमुळे कॉलिंग सेवा क्रॅश होऊ शकते आणि फोन बूटलूपमध्ये अडकू शकतो. कोणत्या अँड्रॉइड आवृत्त्यांना धोका आणि फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया.
तुमच्या मोबाईलवर एखादा साधा एसएमएस आला आणि त्यामुळे संपूर्ण फोनच बंद पडला तर? अॅड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आढळलेल्या एका गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एसएमस ऑफ डेथ असे या त्रुटीला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा मेसेज नेहमीच्या एसएमएसप्रमाणे इनबॉक्समध्ये दिसतही नाही आणि तो उघडण्याची गरजही नसते. सायबर सुरक्षा संशोधक मार्क ब्लास्झिक यांनी ही त्रुटी उघड केलीय. यामुळे फोनची कॉलिंग सेवा बंद पडू शकते, सुरू असलेले कॉल ब्रेक होऊ शकतात आणि काही प्रकरणांत फोन वारंवार रीस्टार्ट होण्याच्या समस्येत अडकू शकतो. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
एसएमएस ऑफ डेथ म्हणजे नेमके काय?
अॅड्रॉईडच्या टेलिफोनी सिस्टीममधील एका तांत्रिक त्रुटीचा गैरवापर करून विशेष प्रकारचा डेटा एसएमएस तुम्हाला पाठवला जाऊ शकतो. मेसेज प्रोसेस होत असताना फोन क्रॅश होतो.यूजर्सनी मेसेज उघडायचा नसोत किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करायचे नसते. त्यामुळे याला ‘झिरो-क्लिक’ हल्ला म्हटले जाते.
फोनवर नेमका काय परिणाम होऊ शकतो?
या त्रुटीमुळे फोनमधील कॉल हाताळणारी सिस्टीम बंद पडू शकते. परिणामी सुरू असलेले कॉल ब्रेक होऊ शकतात आणि काही काळ नेटवर्क सेवा खंडित होऊ शकते. वारंवार असे मेसेज आल्यास फोन बूटलूपमध्ये अडकण्याची शक्यता असते. म्हणजेच यूजर फोन सुरू होण्याचा प्रयत्न करतो, पण फोन पुन्हा क्रॅश होतो. आपत्कालीन क्रमांकांवरील कॉलही अशा वेळी खंडित होऊ शकतात.
कोणत्या अॅड्रॉईड फोनला धोका?
संशोधकांनी अॅड्रॉईड 12 ते अॅड्रॉईड 16 पर्यंतच्या आवृत्त्यांवर या त्रुटीची चाचणी केली. गुगलने अॅड्रॉईड 14 ते 17 साठी ऑक्टोबर 2026 च्या सुरक्षा अपडेटमध्ये दुरुस्ती केली. मात्र अॅड्रॉईड 12 आणि 13 वापरणाऱ्या काही हँडसेटना हे अपडेट मिळालेली नाही. प्रत्यक्ष धोका फोनच्या मॉडेलवर आणि उपलब्ध सुरक्षा अपडेटवर अवलंबून आहे.
फॅक्टरी रिसेट केल्यानेही समस्या सुटेलच असे नाही
या हल्ल्यातील मेसेज फोनच्या इनबॉक्समध्ये दिसत नसल्यामुळे तो ओळखणे कठीण ठरू शकते. फोन पुन्हा सुरू झाल्यावर नेटवर्ककडून तोच मेसेज पुन्हा पाठवला गेल्यास समस्या कायम राहू शकते. संशोधकांच्या मते, काही प्रकरणांत कॉम्प्युटरला फोन जोडून तांत्रिक पद्धतीने मेसेज हटवावे लागू शकतात. सामान्य यूजर्ससाठी ही प्रक्रिया अजिबात सोपी नसते.
अॅड्रॉईड यूजर्सनी काय काळजी घ्यावी?
मोबाईलच्या सेटींगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट तपासा. उपलब्ध असलेले लेटेस्ट अॅड्रॉईड आणि सिक्योरीटी अपडेट त्वरित इन्स्टॉल करा.
अपडेटनंतर फोन रीस्टार्ट करा. फोनला सिक्योरीटी अपडेट मिळत नसल्यास प्रोडक्टच्या अधिकृत सपोर्टकडून माहिती घ्या. फोन वारंवार क्रॅश होत असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरची मदत घ्या.