फिक्स्ड टर्म कर्मचारी, कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांसाठी नवे नियम, पात्रता आणि गणनेचे सूत्र जाणून घेऊया.
पाच वर्षे पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास ग्रॅच्युइटी मिळते का?
1/9
5 वर्षे पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास ग्रॅच्युइटी मिळेल? नवा नियम जाणून घ्या
खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची सेवा पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास ग्रॅच्युइटी मिळत नाही, असे वाटते. मात्र, नव्या कामगार संहितेमुळे काही कर्मचाऱ्यांसाठी हा नियम बदलला आहे. केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून चार नवीन कामगार संहिता लागू केल्या. त्यानुसार ठरावीक मुदतीच्या करारावर थेट नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळू शकते. मात्र, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांची अट कायम आहे. ग्रॅच्युइटी कोणाला, किती आणि कधी मिळते? जाणून घेऊया.
2/9
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने संस्थेत दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना कंपनीकडून मिळणारी एकरकमी रक्कम. ही रक्कम भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफपेक्षा वेगळी असते. कर्मचारी निवृत्त झाल्यास, राजीनामा दिल्यास किंवा ठरावीक अटींनुसार नोकरी संपल्यास ग्रॅच्युइटी देय होते.
3/9
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांची अट कायमस्वरूपी कर्मचाऱ्याने एकाच संस्थेत सलग किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर राजीनामा किंवा निवृत्तीच्या वेळी ग्रॅच्युइटी मिळते. त्यामुळे चार वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा करून नोकरी सोडल्यास सामान्यतः ग्रॅच्युइटी मिळत नाही. मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणात मात्र पाच वर्षांची अट लागू होत नाही.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांची अट
कायमस्वरूपी कर्मचाऱ्याने एकाच संस्थेत सलग किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर राजीनामा किंवा निवृत्तीच्या वेळी ग्रॅच्युइटी मिळते. त्यामुळे चार वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा करून नोकरी सोडल्यास सामान्यतः ग्रॅच्युइटी मिळत नाही. मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणात मात्र पाच वर्षांची अट लागू होत नाही.
4/9
फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना एक वर्षात लाभ
नव्या कामगार संहितेतील महत्त्वाचा बदल म्हणजे थेट नियुक्त केलेल्या फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना करारानुसार एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळू शकते. यासाठी पाच वर्षे थांबण्याची गरज नाही. हा लाभ कराराचा कालावधी संपल्यावरही लागू होतो.
5/9
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वेगळा नियम
कंत्राटदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा नियम आपोआप लागू होत नाही. केंद्राच्या कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की फिक्स्ड टर्म रोजगारामध्ये नियोक्त्याने थेट नियुक्त केलेले कर्मचारी येतात. कंत्राटी कामगारांच्या बाबतीत ग्रॅच्युइटीची जबाबदारी कंत्राटदाराची असून पाच वर्षांच्या सलग सेवेची अट लागू होते.
6/9
कामगार पत्रकारांसाठी तीन वर्षांची तरतूद
सामान्य कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांची अट असली तरी कामगार पत्रकारांसाठी विशेष तरतूद आहे. कायद्यातील व्याख्येनुसार कामगार पत्रकाराला तीन वर्षांची सलग सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळण्याची तरतूद आहे.
7/9
ग्रॅच्युइटीची गणना कशी होते?
ग्रॅच्युइटी मोजण्याचे सूत्र असे आहे.ग्रॅच्युइटी = (15 ÷ 26) × शेवटचे पात्र मासिक वेतन × सेवावर्षे.उदाहरणार्थ, पात्र वेतन 30 हजार रुपये आणि सेवा 5 वर्षे असल्यास अंदाजे 86538 रुपये ग्रॅच्युइटी मिळू शकते. प्रत्यक्ष रक्कम सेवाकाल आणि लागू नियमांनुसार ठरते.
8/9
वेतनाच्या व्याख्येत बदल
नव्या संहितेनुसार ग्रॅच्युइटीच्या गणनेसाठी मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स यांचा समावेश होतो. एकूण मोबदल्यातील वगळलेल्या भत्त्यांचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रक्कम पात्र वेतनात जोडली जाते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी वाढू शकते.
9/9
नवीन नियम कधीपासून लागू?
नव्या कामगार संहितेनुसार ग्रॅच्युइटीसाठी वेतनाची सुधारित व्याख्याही याच तारखेपासून लागू असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजीनामा किंवा निवृत्ती 21 नोव्हेंबर 2025 नंतर झाल्यास त्या वेळी लागू असलेल्या नियमांनुसार गणना केली जाईल. कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्यापूर्वी नियुक्तीपत्र, वेतनाची रचना आणि सेवा नोंदी तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.