माजी फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकातील खुलाशांमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सँडपेपर वाद पुन्हा उकळला आहे. उस्मान ख्वाजाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये 2018 मध्ये मैदानावर झालेल्या सँडपेपर वादाबद्दल पुस्तकामध्ये उघडपणे सांगितले आहे, त्याचबरोबर त्याच्या संघातील काही मोठ्या खेळाडूंनी देखील या खुलाशाला दुजोरा दिला आहे. सँडपेपर वादाच्या चर्चा सुरु असताना आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. नक्की काय म्हणाला शोएब अख्तर यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
'रावलपिंडी एक्सप्रेस' म्हणून लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने एक धक्कादायक खुलासा बॅाल टेम्पिरिंग संदर्भात केला आहे. शोएब अख्यर हा विजडनसोबत बोलताना म्हणाला की, "आता हा विषय सोडून द्या, या खुलाशाबद्दल तुम्ही एवढा गदारोळ का करत आहात? मला वाटतं यामुळे क्रिकेटचं नुकसान होत आहे. आपल्या क्रिकेटचंही नुकसान होत आहे, आम्ही इंग्लंडमध्ये सँडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो. आम्ही चेंडू बदलायचो आणि अशा अनेक गोष्टी करायचो. म्हणजे, ठीक आहे, तुम्ही सत्य समोर आणलं आहे, पण त्याचा एवढा गदारोळ करण्याची काही गरज नाही."
हे ही वाचा
पुढे त्याने उस्मान ख्वाजाच्या या वक्तव्याशी सहमती दर्शवली आणि तो म्हणाला, "उस्मान जे म्हणाला तो सांघिक निर्णय असायला हवा. तो केवळ दोन-चार खेळाडूंचा निर्णय असू शकत नाही. हे बोलल्याबद्दल मला खेद वाटतो, पण आम्ही क्रिकेटच्या चेंडूने खेळायचो, मी सुद्धा अनेक गोष्टी केल्या आहेत. संपूर्ण संघाला याची जाणीव होती, कारण जर आम्ही चेंडूला रिव्हर्स स्विंग करू शकलो नसतो, तर आम्ही सामना जिंकू शकलो नसतो. आता ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे पूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र, असे व्हायला नको होते. सत्य सांगून त्याने योग्य गोष्ट केली, पण त्याची वेळ अधिक योग्य असू शकली असती."
'सँडपेपर गेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यातील प्रमुख भूमिकेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅन्क्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घातली. या वादानंतर बॅन्क्रॉफ्ट पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाकडून खेळला नाही, तर स्मिथ आणि वॉर्नर यांनी पुनरागमन केले. माजी फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात खुलासा केला आहे की, संपूर्ण संघाला या कटाची माहिती होती.