SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'नावामुळेच मोहम्मद सिराजला संघात घेतलं नाही,' काँग्रेस खासदाराच्या विधानाने गदारोळ! भाजपाने दिलं प्रत्युत्तर

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून सिराजला वगळण्यात आल्याने सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 15:42 IST | Updated: Nov 20, 2026, 15:55 IST
Image Credit: 'नावामुळेच मोहम्मद सिराजला संघात घेतलं नाही,' काँग्रेस खासदाराचं विधान
Join

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र आता या मुद्द्याने राजकीय वळण घेतल्याचं दिसत आहे. याचं कारण काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं असून, ही टिप्पणी लज्जास्पद" असल्याचं म्हटलं आहे. 'ANI'शी बोलताना मसूद म्हणाले की, यापूर्वीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली असतानाही केवळ नावामुळेच या मोहम्मद सिराजला अंतिम संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

काँग्रेस नेत्याने आरोप केला की, "असं म्हटलं जात आहे की, चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याचे नाव सिराज आहे, म्हणूनच त्याला संघात घेतलं गेलं नाही. जर चांगली कामगिरी करूनही तुम्ही त्याला निवडत नसाल, तर हा भेदभाव स्पष्टपणे दिसून येतो."

 

 

इम्रान मसूद यांना प्रत्युत्तर देताना, भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर क्रिकेट संघाच्या निवडीच्या बाबतीतही 'व्होट-बँकचे राजकारण' करत असल्याचा आरोप केला आहे. "काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. काँग्रेस आता क्रिकेट संघ निवडीमध्येही 'व्होट-बँक'चे राजकारण करत आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, 'सिराजला संघातून वगळले कारण तो मुस्लिम आहे.' अरे, जडेजालाही तर वगळले होते. प्रत्येक क्रिकेटपटू भारताचे प्रतिनिधित्व करणारी जर्सी परिधान करतो. 'व्होट-बँक' आणि जातीयवादी राजकारणासाठी भारतीय क्रिकेट संघाचे विभाजन करणे थांबवा," अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

 

 

सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठीच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून सिराजला वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, संघ व्यवस्थापनाने या वेगवान गोलंदाजाच्या अनुभवाचा विचार करायला हवा होता.

 

 

भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या चार गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. सुनील गावस्कर यांनी मोहम्मद सिराजची निवड न होण आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. तर रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केले की, सिराजचा अनुभव आणि त्याची कामाप्रती असलेली निष्ठा पाहता, त्याला संघात स्थान मिळायला हवं होतं.

मात्र, कर्णधार शुभमन गिल आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.  संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंबद्दल बोलताना गिल म्हणाला: "हे खूप कठीण असते. आम्ही गेल्या आठवडाभरापासून विचार करत होतो की कोणतं कॉम्बिनेशन निवडावं. कारण आमचे सर्व वेगवान गोलंदाज सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. सिराज आणि गुरनूर या दोघांनाही संघात स्थान न मिळणे, ही नक्कीच कठीण गोष्ट आहे."

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही सिराजला संघातून वगळण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचं समर्थन केलं. "सिराजच्या बाबतीत काहीही चुकीचे नाही. संघ निवडताना आम्हाला हा सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ वाटला. मला नाही वाटत की सिराजला वगळण्याचा निर्णय चुकीचा होता," असे कोटक यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES