'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video
IND VS NZ 2nd Test : पहिल्या इनिंगमध्ये ध्रुव जुरेल सोबत 9 विकेट्ससाठी 46 धावांची महत्वाची पार्टनरशिप करत असताना आकाश दीपच्या डोक्याला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जॅमीसनच्या दोन बाउन्सर लागले. त्यानंतर काइल जॅमीसनचा एक संवाद स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला. जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
IND VS NZ 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात असून यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज आकाशदीप डोक्यावर मार लागल्याच्या कारणामुळे बाहेर झाले. पहिल्या इनिंगमध्ये ध्रुव जुरेल सोबत 9 विकेट्ससाठी 46 धावांची महत्वाची पार्टनरशिप करत असताना आकाश दीपच्या डोक्याला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जॅमीसनच्या दोन बाउन्सर लागले. आता या घटनेशी निगडित एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात न्यूझीलंडचा गोलंदाज जॅमीसनचा आवाज रेकॉर्ड झाला असून त्याचा संवाद ऐकून सर्वांना धक्का बसला.
काय म्हणाला न्यूझीलंडचा गोलंदाज?
आकाश दीपला लागोपाठ शॉर्ट पिच बॉल टाकल्यावर काइल जॅमीसनच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा पश्चात्ताप नव्हता. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅमीसन आपल्या सोबतच्या खेळाडूंना असं सांगताना दिसला की तो भारतीय गोलंदाजांना बाउन्सर मारत आहे. स्टंप माईकवर जेमिसनचे शब्द स्पष्टपणे ऐकू आले, 'काय? त्याने आमच्या दिशेने बाऊन्सर गोलंदाजी केली. मला काय फरक पडतो? जर तो आमच्यावर बाऊन्सर टाकत असेल, तर आम्हीही त्याला तसेच उत्तर देऊ. आम्ही याची सुरुवात केली नव्हती, पण आम्ही याचा शेवट नक्कीच करू'.
हेही वाचा : रोहित आणि विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार? भारताच्या पुढील सीरिजचं शेड्युल समोर
वनडे सीरिजचा बदला घेतायत न्यूझीलंडचे गोलंदाज :
काईल जॅमिसनने व्यक्त केलेला राग आणि सूडाची भाषा, या गोष्टींचा संबंध या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सीरिजशी आहे. नोव्हेंबर 2026 च्या सुरुवातीला वेलिंग्टन येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज यांनी न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना वारंवार बाउन्सर बॉलनी लक्ष्य केले होते.
या सामन्याच्या 41 व्या ओव्हरमध्ये अंशुल कंबोजचा एक वेगवान शॉर्ट बॉल न्यूझीलंडचा गोलंदाज ब्लेयर टिकनर याच्या हेल्मेटवर जाऊन लागला होता. त्यानंतर तो कन्कशनमुळे बाहेर गेला. त्यानंतर मॅट फिशरला त्यांनी सब्स्टीट्यूटच्या रूपाने मैदानात उतरवलं. ही घटना न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या मनात कायम होती आणि त्यांनी क्राइस्टचर्च टेस्टमध्ये याचा सूड उगारला.