फिल्डिंग करताना मैदानात माकडाने खेळाडूवर केला हल्ला, सर्वांची उडाली घाबरगुंडी, Video Viral
Langoor attack Cricketer Uma Kashvi : नागपूरच्या के वीसीए स्टेडियमवर कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात महिला अंडर 19 टी20 ट्रॉफी एलीट क्वार्टर फायनल सामना खेळवला गेला. 22 ऑक्टोबर रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात मैदानात माकडाने खेळाडूवर हल्ला केला.
Langoor attack Cricketer Uma Kashvi : अनेकदा तुम्ही साप, मांजर, कुत्रा, कोल्हा इत्यादी प्राणी मैदानात आल्याने सामना काहीवेळ थांबवला गेल्याचे पाहिले असेल. मात्र महिला अंडर 19 टी20 ट्रॉफी एलीट क्वार्टर फायनल सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. सामना सुरु असताना मैदानात अचानकपणे एक माकड घुसलं आणि त्याने मैदानात फिल्डिंग करत असलेल्या महिला खेळाडूवर हल्ला केला. नागपूरच्या के वीसीए स्टेडियमवर कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान सदर घटना घडली. माकडाच्या हल्ल्यानंतर मैदानावरील इतर महिला खेळाडू सुद्धा घाबरल्या. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाउंड्रीजवळून मैदानाच्या दिशेने धावत आला माकड :
22 ऑक्टोबर रोजी कर्नाटक अंडर 19 महिला आणि विदर्भ अंडर-19 महिला यांच्यात सामना अत्यंत रोमांचक वळणावर असताना बाउंड्री जवळून मैदानाच्या दिशेने एक माकड पळत आतल्या बाजूला आलं. यावेळी विदर्भची खेळाडू उमा काशवी ही बाउंड्री जवळ फिल्डिंग करत होती. अचानकपणे आपल्याकडे वेगाने येणाऱ्या माकडाला पाहून उमा घाबरली. जेव्हा उमाने माकडाला जवळ येताना पाहिले, तेव्हा तिने त्याच्या मार्गातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. सुदैवाने माकडाने या तरुण क्रिकेटपटूला कोणतीही इजा पोहोचवली नाही आणि ते लगेच तिथून निघून गेले. या विचित्र आणि भीतीदायक प्रसंगानंतर उमा काश्वीने त्वरित स्वतःला सावरले आणि ती पुन्हा उभी राहिली त्यानंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला.
मैदानावरील या घटनेला वगळता दोन्ही संघांमधील सामना अत्यंत चुरशीचा ठरला. अखेरीस कर्नाटकने सहा धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 140 धावसंख्या उभारली. विजयासाठी दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना विदर्भ संघाने शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. मात्र 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून त्यांना केवळ १३४ धावा करता आल्या आणि ते विजयापासून अवघ्या सहा धावांनी दूर राहिले. या विजयासह कर्नाटक संघाने महिला अंडर-19 टी-20 ट्रॉफी एलीट स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला, परंतु एका माकडाच्या मैदानावरील अनपेक्षित आगमनामुळे ही उपांत्यपूर्व फेरीची लढत खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.