सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?
मुंबई इंडियन्स संघाने कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. मिचेल मॅक्लेनॅघन, टी. दिलीप आणि धवल कुलकर्णी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाले आहेत.
मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2027 हंगामासाठी संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षक (बॅटिंग कोच), मिचेल मॅक्लेनॅघनची गोलंदाजी प्रशिक्षक (बोलिंग कोच), टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (फील्डिंग कोच) आणि धवल कुलकर्णी यांची डेव्हलपमेंट गोलंदाजी प्रशिक्षक (डेव्हलपमेंट बोलिंग कोच) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. हे सर्वजण मुख्य प्रशिक्षक पोलार्डसोबत नवीन कोचिंग टीमचा भाग असतील.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात घोषणा केली. फ्रँचायझीने आपल्या नवीन कोचिंग सेटअपमध्ये अशा व्यक्तींचा समावेश केला आहे, ज्यांचा मुंबई इंडियन्स संघ आणि भारतीय क्रिकेटशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे.
उथप्पा, मॅक्लेनॅघन आणि कुलकर्णी यांच्यासाठी हे पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या संघात परतण्यासारखं आहे. कारण या खेळाडूंनी यापूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तिन्ही खेळाडू मुंबई संघाकडून खेळले असल्याने त्यांना संघाची मूल्ये, अपेक्षा आणि मानसिकता याची जाण आहे. पोलार्डचा तर मुंबईसोबत मागील 16 वर्षापासून संबंध आहे.
पोलार्ड मुख्य प्रशिक्षक
पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या सर्वात प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे. त्याने दीर्घकाळ या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले असून, संघाच्या अनेक जेतेपदांच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा पोलार्ड आता प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.
रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
मुंबई इंडियन्सने भारतीय संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाची नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उथप्पा या फ्रँचायझीच्या पहिल्या हंगामात संघाचा भाग होता आणि आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याच्या नियुक्तीबाबत मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, उथप्पा यांना खेळाची सखोल समज आहे. खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता आणि तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल.
मॅक्लेनॅघनचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनॅघनची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो यापूर्वीही मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुनरागमनाचे स्वागत एका खास पद्धतीने केले आहे. त्यांनी म्हटले की, जेव्हा चाहत्यांनी "गेट मिच!" (Get Mitch!) अशी साद घातली, तेव्हा त्यांनी त्याला परत आणले.
टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आता 'मुंबई इंडियन्स'चे नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. भारतीय संघासोबत त्यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली होती. आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघांचा ते भाग राहिले आहेत. तेच यश ते पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला दाखवतील अशी आशा आहे.
धवल कुलकर्णीची 'डेव्हलपमेंट बॉलिंग कोच' म्हणून नियुक्ती
मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीची 'डेव्हलपमेंट बॉलिंग कोच' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेटमधील हे एक परिचित नाव आहे.
मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्याने अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.